नवी मुंबई महापालिकेत महिलाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navi-mumbai-municipal
नवी मुंबई महापालिकेत महिलाराज

नवी मुंबई महापालिकेत महिलाराज

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीमुळे नामवंत नगरसेवकांना थेट घरचा रस्ता धरावा लागणार आहे. महिला आरक्षणामुळे बहुतांश प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे महापालिकेत १२२ जागांपैकी तब्बल ६१ जागांवर फक्त महिला नगरसेविका दिसणार आहेत. महिलांसाठी प्रभाग आरक्षित झाल्याने पुरुष नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत यंदा माजी मंत्री आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. मागील २५ वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेली नाईकांची एकहाती सत्ता उलथवून लावण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वज्रमूठ आवळली गेली आहे. त्यासाठी राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर नवी मुंबई आणि ठाण्यात नेत्यांकडून करून घेतला जात आहे. अगदी प्रभाग रचना असोत अथवा आलेल्या हरकतींवरील सुनावणी असो, सर्व ठिकाणी मविआचे पारडे जड राहिले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले होते. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे ४१ प्रभागांमधील १२२ जागांवर जातीय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १२२ पैकी ६ जागांवर अनुसूचित जातींच्या महिला, अनुसूचित जमातींच्या महिलेसाठी एक आणि सर्वसाधारण महिला वर्गात तब्बल ५४ जागा वाट्याला आल्या.

महापालिकेतील १२२ जागांपैकी ६१ जागांवर थेट महिला उमेदवारालाच सर्व राजकीय पक्षांना संधी द्यावी लागणार आहे. महिला आरक्षणाच्या सोडतीमुळे नगरसेवकपदासाठी तयारी करणाऱ्या पतिराजांना घरी बसावे लागणार आहे. तीन सदस्यांच्या एका पॅनेलवर दोन महिला उमेदवार आल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी इच्छुक पुरुष उमेदवांराना घरी थांबून घरातील महिला उमेदवाराला संधी द्यावी लागणार आहे.

रस्सीखेच सुरू

- भोलानगर, ईश्वरनगर, आनंदनगर, मुकंद कंपनी ते एमआयडीसीतील सीएनजी पंपापर्यंतचा रस्ता असा प्रभाग क्रमांक १ आणि दिघा गाव, गणेशनगर, आंबेडकरनगर असा प्रभाग क्रमांक २ आणि इलठाणपाडा गवते वाडीपासून ते एमआयडीसी सेंट्रल रोडपर्यंत विखुरलेला प्रभाग ३ या ठिकाणी आपल्यालाच उमेदवारी मिळवण्यासाठी मविआतील मित्रपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

- या प्रभागांतील जागांवर शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक रामाशीष यादव आणि जगदीश गवते यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अन्नू आंग्रे यांनी दावा केला आहे.

- माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या जुन्या प्रभागाची तीन शकले झाली आहेत. त्यामुळे ते स्वतः, त्यांचे कुटुंबीय वेगवेगळ्या प्रभागातून लढणार आहेत.

- वाशीत प्रभाग क्रमांक २६ मध्येही मविआ आणि भाजपमध्ये गोंधळाची परिस्थिती होण्याची शक्यता आहे. या प्रभागात दोन महिला व एक पुरुष उमेदवाराची जागा आरक्षित आहे; परंतु या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या तिन्ही उमेदवारांनी दावा केला आहे; तर भाजपकडूनही दोन माजी नगरसेवक व दोन नवख्या उमेदवारांनी दावा आधीपासूनच केला आहे.

महिला महापौर

नवी मुंबई महापालिकेच्या गतपंचवार्षिक काळात दोन्ही वेळेस पुरुष महापौर आरक्षित होते; परंतु या वेळेस खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद आरक्षित आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार महिला महापौर भूषवणार आहेत. महिला उमेदवारांना महापौरपदाची नामी संधी आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84238 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top