
मिरा भाईंदरमध्ये सात शाळा अनधिकृत
भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात सात शाळा अनधिकृत असल्याचे महापालिकेने घोषित केले आहे. या शाळांना नोटिसा बजावून त्या बंद करण्याचे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहेत. त्यानंतरही शाळा बंद करण्यात आल्या नाहीत, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली. समग्र शिक्षण अभियानाच्या सर्वेक्षणातून शहरात सात शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. त्यात एक शाळा मराठी माध्यमाची; तर उर्वरित सहा शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या शैक्षणिक संस्थांनी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता शाळा सुरू केली आहे.
यंदा तिसऱ्या इयत्तेसाठी सेमीइंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. हे शिक्षण देण्यासाठी बारावी विज्ञान डीएड किंबा बीएड ही शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. ही पात्रता असलेले ३६ शिक्षक मानधनावर घेण्यासाठी महासभेने नुकतीच मान्यता दिली आहे. महापालिकेकडून प्रत्येक शिक्षकाला मासिक २० हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार होते. या शिक्षकांची नेमणूक ११ महिन्यांसाठी असल्यामुळे महापालिकेला दरवर्षी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार होता; मात्र शिक्षण विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी महापालिकेच्या सध्या सेवेत असलेल्या १५४ शिक्षकांचा फेरआढावा घेतला असता त्यातील ४८ शिक्षकांकडे सेमीइंग्रजी शिकवण्यासाठी शैक्षणिक पात्रता असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे सेमीइंग्रजी शिक्षण देण्यासाठी मानधनावर शिक्षक घेण्याचा प्रस्ताव मुठे यांनी रद्दबातल केला. आता पालिकेच्या शिक्षकांवरच ही जबाबदारी देण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84273 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..