
सामूहिक आत्महत्याप्रकरणी बेपत्ता पित्याला शोधण्यात यश
भाईंदर - काशी-मिरा येथील हॉटेलमध्ये सापडलेल्या सात वर्षीय मुलीच्या मृतदेह प्रकरणातील बेपत्ता पिता रायन ब्राको याला पोलिसांनी शोधून काढले आहे. मिरा रोडच्या एका लॉजमध्ये तो सापडला. सोमवारी (ता. ३०) सकाळी काशी मिरा येथील सिजन्स हॉटेलमध्ये अनायका ब्राको या सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता; तर तिची आई पूनम ब्राको गंभीर अवस्थेत आढळून आली होती. पिता रायन ब्राको मात्र बेपत्ता होता. आर्थिक विवंचनेतून या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
रायन कर्जबाजारी झाला होता. कर्ज देणारे पैशांसाठी मागे लागल्यामुळे रायन आधी वसईतील एका हॉटेलमध्ये आणि नंतर २७ मे रोजी काशी मिरा येथील सिजन्स हॉटेलमध्ये कुटुंबासह उतरला होता. पैशांची कोणतीही व्यवस्था न झाल्यामुळे अखेर रायनने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
रायनने रविवारी (ता.२९) उंदीर मारण्याचे औषध आणून आधी सात वर्षीय अनायकाला पाजले आणि नंतर दोघांनीही विष प्राशन केले. यात मुलीचा मृत्यू झाला; मात्र पती-पत्नीवर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे रायनने पत्नी पूनमला सोबत आणलेल्या चाकूने मारण्याचा निर्णय घेतला. मात्र हिंमत न झाल्याने त्याने तिचा गळा आवळायचा प्रयत्न केला. त्यात ती बेशुद्ध झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी रायन हॉटेलमधून निघून गेला. मंगळवारी त्याला मिरा रोडच्या एका लॉजमधून पोलिसांनी शोधून काढले.
रायनला शोधून काढण्यात आले आहे. त्याच्याकडून चाकूही जप्त करण्यात आला आहे. मात्र मुलीचा शवविच्छेदन अहवाल आणि पती-पत्नीचा जबाब घेतल्यानंतरच याप्रकरणी नेमके काय घडले, हे सांगता येईल.
- संजय हजारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84299 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..