मुंबईकरांनो इट्स नॉट कूल ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो इट्स नॉट कूल !
मुंबईकरांनो इट्स नॉट कूल !

मुंबईकरांनो इट्स नॉट कूल !

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः मुंबईत उकाड्यावर उपाय म्हणून हमखास बर्फाचा वापर केला जातो. अगदी लिंबू-सरबत, उसाचा रस ते रंगांच्या गोळ्या हे सर्व पदार्थ आपण उन्हाळ्यात आवडीने सेवन करतो; पण हे करत उकाड्यापासून सुटका करण्याच्या नादात आपण एखाद्या रोगाला आमंत्रण तर देत नाही ना, हेही आपल्याला पाहावे लागेल. कारण जो बर्फ आपण खातो तो कुठे साठवला जातो हे आपल्याला ठाऊक नसते. मुंबईत अनेक ठिकाणी बर्फाची साठवणूक व वितरण अतिशय घाणेरड्या जागेत आणि कुठलीही स्वच्छता न पाळता केले जाते हे आढळून आले आहे. बर्फाची साठवणूक कशाप्रकारे होते हे पाहण्यासाठी ‘सकाळ’ने मुंबईतील विविध भागांत पाहणी केली. तेव्हा मुंबई शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी बर्फाची हाताळणी करताना स्वच्छता पाळण्यात येत नाही, असे दिसले.

मुंबईत जे जे रुग्णालय परिसर, भेंडी बाजार, कुर्ला, वरळी, सांताक्रूझ या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ‘सकाळ’ने बर्फाची साठवणूक करण्याची ठिकाणे शोधली. तेव्हा अनेक ठिकाणी महापालिकेच्या फूटपाथवर खुल्या जागेत बर्फाची साठवणूक करण्यात आल्याचे आढळले. खाण्याचा बर्फ ठेवणे, साठवणूक करणे आणि वाहतूक करणे यासाठीच्या एफएसएसएआयची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. खाद्य पदार्थांच्या संपर्कात येणाऱ्या बर्फासाठीही ही तत्त्वे लागू आहेत; पण बर्फाची साठवणूक करताना ही तत्त्वे पाळलेली दिसली नाहीत. अनेक ठिकाणी अस्वच्छ अशा फूटपाथ किंवा अडगळीच्या जागेतच बर्फ साठवला जातो. बर्फ झाकण्यासाठी साधारणपणे बारदानाचा किंवा गोणपाटाचा वापर अनेक ठिकाणी केला गेला; तर अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या ताडपत्रीनेही बर्फाला आवरण घालण्यात आलेले दिसले.


बर्फाचे रंगनिहाय वर्गीकरण
४ मे २०१८ च्या कायद्यान्वये एफएसएसएआय गाईडलाईन्सनुसार खाण्याचा बर्फ आणि कमर्शिअल वापराचा बर्फ यासाठीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. कमर्शिअल वापरासाठीचा
म्हणजे नॉन एडिबल बर्फ हा अस्वच्छ पाण्यापासून तयार करण्यात येतो. नॉन एडिबल बर्फासाठी निळा रंग वापरण्यात यावा, असे आदेश कायद्यान्वये देण्यात आले; तर खाण्याचा बर्फ हा रंगहीन असावा, असे कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. १ जून २०१८ पासून हे रंगनिहाय वर्गीकरण अपेक्षित होते; पण अनेक ठिकाणी याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले आहे.  

कारवाईसाठी मनुष्यबळ तोकडे
अन्न व औषध प्रशासनाकडे आरोग्यासाठी अपायकारक अशा बर्फाच्या साठवणुकीवर कारवाई करण्याची जबाबदारी असते. मुंबईत यंदाच्या उन्हाळी मोहिमेत एकाही ठिकाणी एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नाही, अशी माहिती विभागाने दिली. सध्या विभागात अतिशय तोकडे मनुष्यबळ असल्यानेच कारवाई करण्यात मर्यादा होत्या, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जबाबदारी कोणाची ?
मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक अशा बर्फावर कारवाईचा अधिकार हा मुंबई महापालिकेकडून केंद्राच्या एफएसएसएआयच्या कायद्यान्वये काढून टाकण्यात आला
आहे. त्यामुळे ही जबाबदारी राज्य सरकारच्या अखत्यारितील अन्न व औषध प्रशासनाकडे आली. देशात सध्या कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आरोग्यासाठी अपायकारक अशा बर्फावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
----------
अन्न आणि औषध प्रशासनाने मालाड, कुर्ला आणि विलेपार्ले याठिकाणी मोहीम राबवत ज्यूस सेंटरवर कारवाई केली आहे. या कारवाईत पाकिजा ज्यूस सेंटर आणि कोल्ड
कॉर्नर कुर्ला या ठिकाणी कारवाई करत या दोन्ही सेंटरला बंद करण्यासाठीची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईत एकूण सात ठिकाणी मोहीम राबवत अन्न व औषध
प्रशासनाने नमुने घेतले आहेत. कुर्ल्यातील कारवाईत ज्यूस सेंटरकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळले. तसेच सेंटरच्या ठिकाणी अस्वच्छताही आढळल्याचे दिसले
आहे.
- महेश चौधरी, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84317 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top