
एमआयडीसी नाल्याला पुन्हा हिरवे पाणी
डोंबिवली, ता. १ ः डोंबिवली औद्योगिक विभाग फेज २ मधील गणेशनगर परिसरातील नाल्यात गेल्या दोन दिवसांपासून हिरव्या रंगाचे रसायन मिश्रित पाणी सोडले जात आहे. सकाळ किंवा रात्रीच्या वेळेस हे पाणी कारखान्यांतून नाल्यात सोडले जात असून या पाण्याच्या उग्र दर्पाने स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. सांडपाण्यावर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे, तसेच रसायन मिश्रित पाण्यामुळे निवासी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनाने औद्योगिक विभागातील १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याप्रकरणी कारवाई शून्य असल्याने स्थानिकांना आजही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणामुळे शहरातील अंतर्गत नाल्यांना हिरवा, निळा, पांढरा, नारंगी असे अनेक रंग प्राप्त होऊन त्यांच्या उग्र दर्पामुळे डोळे चुरचुरणे, मळमळ, उलट्या यांसारखे त्रास कायम सतावत आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिसराची पाहणी करून येथील समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारने कारखाने स्थलांतराचा निर्णय घेतला असला तरी त्यावर अंमलबजावणी का केली जात नाही. रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचे निर्णय घेऊन केवळ नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. प्रत्यक्ष कारवाई न करता राज्य शासन कारखानदारांना सूट दिली जात असल्याचा आरोपही स्थानिक नागरिक करत आहेत.
गेल्या तीन-चार दिवसांपासून गणेशनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात घाणेरडा वास येत आहे. नाल्याची पाहणी केली असता येथील चेंबरमधून हिरवे पाणी येत असल्याचे दिसले. यापूर्वीही या नाल्याला रसायनमिश्रित पाण्यामुळे विविध रंग प्राप्त झालेले आहेत. नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना प्रशासन अद्यापही गांभीर्याने का घेत नाही?
- शशिकांत कोकाटे, स्थानिक रहिवासी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84328 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..