
महागाईचे पाप झाकण्याचा प्रयत्न
मुरबाड, ता. १ (बातमीदार) ः शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसंपर्क अभियानादरम्यान भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप महागाईचे पाप झाकून ठेवत सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी केली. मुरबाड येथील शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते.
राज्यात शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे. पालिका निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेचे हे अभियान अत्यंत प्रतिष्ठेचे ठरले आहे. मुरबाड येथेही बुधवारी या शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना खासदार विनायक राऊत उपस्थित होते. अभियानादरम्यान बोलताना विनायक राऊत यांनी केंद्र सरकारला महागाईच्या मुद्द्यावर लक्ष्य केले. विनायक राऊत म्हणाले की, भाजपकडून महागाईचे पाप झाकून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजपच्या विश्वासघातकीपणामुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भिवंडी पूर्व व शहापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता, असा आरोपही विनायक राऊत यांनी या वेळी केला.
मुरबाड येथील शिवसंपर्क अभियानात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रमुख निरीक्षक जनार्दन गालपगारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख कला शिंदे, युवा सेना अधिकारी प्रभुदास नाईक, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या शिवसंपर्क अभियानादरम्यान डोंगरन्हावे येथील जवळपास १५० महिला कार्यकर्त्यांनी व अन्य सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
बंधाऱ्यांचे लोकार्पण
संगम तीर्थक्षेत्र येथे ८० लाख रुपये खर्चून बंधारा उभारण्यात आला आहे. शिवसंपर्क मेळाव्याआधी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84360 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..