
नरेंद्र मेहतांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. आठ कोटी रुपयांहून अधिकची बेनामी संपत्ती गोळा केल्याच्या आरोपावरून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नरेंद्र मेहता व त्यांच्या पत्नीविरोधात नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी मेहता यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
मेहता यांनी २००५ ते २०१५ या काळात आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदा संपत्ती जमा केल्याची तक्रार २०१६ मध्ये लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. त्यावर लोकयुक्तांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या विभागाने मेहता यांचे घर व कार्यालय येथे धाडी टाकून आठ कोटी रुपयांहून अधिक बेनामी संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली नरेंद्र मेहता व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मेहता यांनी ठाणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यानच्या काळात जामीन आदेशावर निर्णय होत नाही तोपर्यंत मेहता यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. ३० मे रोजी सत्र न्यायालयात जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर बुधवारी न्यायालयाने मेहता यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मेहता आता उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84398 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..