
तब्बल १० हजार पुस्तकांचे आदान-प्रदान
ठाणे, ता. २ (बातमीदार) : हिंदी, इंग्रजी, मराठी या तीन भाषांतील विविध विषयांवरील वाचलेली अनेक पुस्तके वाचकांनी दान केली, तर दान केलेल्या पुस्तकांपैकी आवडणारी पुस्तके वाचकांनी घेतली. असा आगळा-वेगळा आदान-प्रदान महोत्सवात ठाण्यात रंगला. या महोत्सवाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल एक हजारहून अधिक वाचकांनी या महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात तब्बल १० हजारहून अधिक पुस्तकांचे आदान-प्रदान करण्यात आले.
व्यास क्रिएशन्स आणि राज्ञी वूमन वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने २६ ते २८ मे दरम्यान ठाण्यात आदान-प्रदान महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात व्यास क्रिएशनच्या तब्बल १० पुस्तकांचे प्रकाशनही पार पडले.
आदान-प्रदान महोत्सव आणि प्रकाशन सोहळा ठाण्यातील सहयोग मंदिर येथे पार पडला. याचे उद्घाटन अभिनेत्री आणि ज्येष्ठ गायिका फय्याज यांच्या हस्ते करण्यात आले होते. पुस्तक प्रकाशन, आदान प्रदान, अभिवाचन, कथाकथन, नाट्य अशा सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगलेल्या या महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रातिसाद लाभला.
पुस्तकांचे प्रकाशन
महोत्सवावेळी सुचित्रा कुलकर्णी लिखित ‘कबिर बोध'', अनुराधा कुलकर्णी लिखित ‘महर्षी व्यास'', वृंदा दाभोलकर लिखित ‘उमजलेलं सांगताना'', कौस्तुभ सावरकर लिखित ‘कप्पा'', विशाल कुलकर्णी लिखित ‘गोष्टींचा मळा'', माधुरी बागडे लिखित ‘असंच का?'', श्री. वा. नेर्लेकर लिखित ‘वि. दा. सावरकर'', डॉ. विजय कुलकर्णी लिखित ‘हुतात्मा कोष'', मधुवंती दांडेकर लिखित ‘मधुगंध'' आणि रश्मी जोशी लिखित ‘आधाररेखा'' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84422 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..