भाईंदर मेट्रो स्थानकांच्या नावांमधील बदलावरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाईंदर मेट्रो स्थानकांच्या नावांमधील बदलावरून वाद
भाईंदर मेट्रो स्थानकांच्या नावांमधील बदलावरून वाद

भाईंदर मेट्रो स्थानकांच्या नावांमधील बदलावरून वाद

sakal_logo
By

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : दहिसरहून पुढे मिरा-भाईंदरला येत असलेल्या मेट्रोच्या स्थानकांची मिरा-भाईंदर महापालिकेने निश्चित केलेली नावे एमएमआरडीएकडून बदलण्यात आली आहेत. यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. स्थानकांची नावे परस्पर बदलणे हा महासभेचा अपमान असल्याची भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे; तर ही नावे कोणाच्या कार्यकाळात बदलण्यात आली, यावरून भाजप व शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. स्थानकांची नावे महाविकास आघाडी सरकारनेच बदलल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे, तर स्थानकांची बदललेली नावे असलेले सरकारी आदेश २०१८ मध्ये निघाल्यामुळे भाजप सरकारच्या काळातच ही नावे बदलण्यात आल्याचा पलटवार शिवसेनेने केला आहे.
मेट्रोच्या कामाची सद्यस्थिती स्पष्ट करण्यासाठी एमएमआरडीएने नगरसेवकांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण करावे, असे पत्र महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएने गुरुवारी (ता. २) पालिका सभागृहात त्याचे सादरीकरण केले. यावेळी सादरीकरणात दाखवलेली मेट्रो स्थानकांची नावे महासभेने निश्चित केलेल्या नावांपेक्षा भिन्न असल्याचा मुद्दा सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमकपणे मांडत या नावांना आक्षेप घेतला. महासभेने स्थानकांची नावे नक्की करून दिली असताना ती परस्पर कशी बदलण्यात आली, हा महासभेचा अपमान आहे, असे सांगून नगरसेवकांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना त्याचा खुलासा करण्यास सांगितले.
त्यावर एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील यांनी सरकारच्या राजपत्रात जाहीर झालेल्या नावांप्रमाणे ही नावे देण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने राजपत्र कधी प्रसिद्ध झाले, नावे कोणाच्या सांगण्यावरून बदलण्यात आली याचा खुलासा करावा, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेताच महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी यासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यां‍नी लेखी माहिती नंतर द्यावी, असे सांगून मेट्रो सादरीकरणाचा कार्यक्रम आटोपता घेतला.

...अशी दिली नावे
दहिसर ते भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत मेट्रोची एकंदर आठ स्थानके आहेत. या स्थानकांना नावे देण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०१७ च्या महासभेमध्ये मंजूर करून तो एमएमआरडीएकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथील स्थानकाला सदानंद महाराज यांचे नाव, मॅक्सस मॉल समोरील स्थानकाला भगवान महावीर स्वामी यांचे नाव, दीपक हॉस्पिटलसमोरील स्थानकाला नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव, साईबाबा नगर येथील स्थानकाला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव, झंकार कंपनी येथील स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग अशी नावे देण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर केला होता; मात्र एमएमआरडीएने गुरुवारी केलेल्या सादरीकरणात महासभेने मंजूर केलेल्या नावांऐवजी भलतीच नावे दिल्याचे स्पष्ट झाले. त्यातही गोल्डन नेस्ट भागातील स्थानकाला मेडतीया नगर असे एका खासगी विकसकाच्या नावावरून नाव देण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84448 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top