
फ्लू, सारी आजारांवर पालिकेचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : गेल्या काही दिवसांपासून विशेषतः मुंबईत कोविड रुग्णांची वाढ होत आहे. मुंबईतील पॉझिटिव्हिटी दरदेखील वाढला असून तो ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. शिवाय पावसाळी आजारदेखील बळावण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन मुंबई पालिकेने सारी तसेच फ्लूच्या आजारांवर बारिक लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत कोविडसदृश लक्षणे आढळून आल्यास जिनोम सिक्वेसिंग करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.
राज्यासह मुंबईत वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येचे कारण नवा व्हेरिएंट आहे का, याची पडताळणीदेखील होत असल्याचे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. बीए४ तसेच बीए५ या व्हेरिएंटचे सात रुग्ण फक्त पुण्यात आढळले आहेत; मात्र हा व्हेरिएंट संसर्ग जलद पसरत असल्याचे जागतिक निरीक्षण आहे. त्यामुळे, मुंबई पालिका सावध झाली आहे. यातून पालिकेने सर्व रुग्णालयांना संध्याकाळची ओपीडी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यातून कोविडसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित ओळखले जाणार आहे. तशी लक्षणे असल्यास रुग्णांचे नमुने आरटीपीसीआर तसेच जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात सात ते आठ रुग्णांमध्ये कोविडसारखीच ताप, खोकला आणि घसादुखीची लक्षणे दिसून आली आहेत. अशा लक्षणांच्या इतर रुग्णांची चाचणी केल्यावर यातील अनेक इन्फ्लूएंझाचे रुग्ण असल्याचे आढळले. आता पुन्हा कोविड रुग्णसंख्या वाढल्याने आगामी आठवड्यात ही स्थिती बदलू शकते. त्यामुळे सावध पावित्रा घेणे उचित ठरेल, असे एका डॉक्टरने सांगितले.
नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे!
‘आम्ही सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांना इन्फ्लूएंझासदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (सारी) रुग्णांकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्यादेखील कराव्यात. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने वाईट परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आम्ही तयारीत आहोत, असे अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे आणि पुढील सहा महिने त्याची गरज पडणार आहे, असेही ते म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84544 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..