कोविड विधवांच्या पुनर्वसनासाठी आराखा सादर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड विधवांच्या पुनर्वसनासाठी आराखा सादर करा
कोविड विधवांच्या पुनर्वसनासाठी आराखा सादर करा

कोविड विधवांच्या पुनर्वसनासाठी आराखा सादर करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांची शेती, दुकाने, घरे व इतर मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यास कायदेशीर साह्य देण्यासाठी प्रयत्न करावेत; तसेच विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी शहरी व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे आराखडे तयार करावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त करण्यासाठी केलेली नावीन्यपूर्ण कामे, असंघटित कामगारांसाठी शासनाने राबविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जात आहे याचा आढावा आज डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकरी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, कामगार उपायुक्त संतोष भोसले हे प्रत्यक्ष; तर ठाणे महापालिका आयुक्त बिपीन शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे हे ऑनलाईन उपस्थित होते. कोविड काळात ठाणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामांची डॉ. गोऱ्हे यांनी स्तुती केली. गोऱ्हे म्हणाल्या की, कोविड अजून गेलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात यावा. ग्रामीण भागातील आठवडी बाजाराच्या दिवशी, तसेच रेल्वेस्थानकाच्या परिसरात शुक्रवारी लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात यावीत. तीर्थक्षेत्रे, जत्रा आदींच्या ठिकाणीही लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात यावी.

विधवांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कोविडमुळे घरातील कर्ती व्यक्ती गमावलेल्या घरांमधील बालविवाह रोखण्यासाठीही जिल्हास्तरावरून मदत करावी. कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये समाविष्ट करण्यात यावे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले.
------
भिवंडीमधील देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी अन्नधान्य व जेवणाची व्यवस्था स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. या काळात १४३७ महिलांना अनुदान वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून सर्जिकल कॉटन निर्मिती, पेपर प्लेट निर्मिती व सॅनिटरी नॅपकिन निर्मिती असे तीन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84563 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top