
सीड बॉल निर्मितीतून वृक्षारोपण
प्रमोद जाधव, अलिबाग
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. यावर उपाययोजनांसाठी शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्थांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातूनच सीड बॉलच्या निर्मितीतून वृक्षारोपणावर भर देण्याचा नवा उपक्रम माणुसकी प्रतिष्ठानने हाती घेतला असून ५५० सीड बॉल तयार करण्यात आले आहे. या उपक्रमाला लहान मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
माणुसकी प्रतिष्ठान, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी सोसायटीच्या सर्व लहान मुलांना सीड बॉल कसे बनवायचे व याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष ५५० सीड बॉल बनवले. लहान मुलांना आतापासूनच सामाजिक कार्याची गोडी कशी लागेल, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माणुसकी प्रतिष्ठान व गोल्ड कोस्ट हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक तापमान वाढत असून वृक्षतोड हे त्यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे. सामाजिक संस्था किंवा सोसायट्यांनी सीड बॉल तयार करून निसर्गात वृक्षांची लागवड करावी व डोंगरांची धूप थांबण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
पाऊस पडताच फुटतो अंकूर
आपण जी फळे खातो त्यांच्या बिया इतरत्र न टाकता त्यांचा संचय करून त्या सुकवायच्या. त्यानंतर माती व शेणखत किंवा गांडूळ खत एकत्र करून त्यामध्ये सुकलेल्या बिया एकत्र करून लाडू सारख्या आकाराचे सीड बॉल तयार करून पुन्हा सुकवायवे. सुकल्यानंतर हे सीड बॉल पाऊस पडून गेल्यावर जंगल किंवा माळरानात टाकायचे. काही दिवसांनी त्याला अंकुर फुटून वृक्षात रूपांतर होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84587 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..