हे मानवा तू मानवता सोडू नको रे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हे मानवा तू मानवता सोडू नको रे...
हे मानवा तू मानवता सोडू नको रे...

हे मानवा तू मानवता सोडू नको रे...

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ५ ः संतांनी दाखविलेल्या मार्गाने जायचे असा विचार जरी मनात आला तरी मनुष्याच्या आयुष्यात किती आमूलाग्र बदल होतात याची प्रचिती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना नव्याने आली. निमित्त होते ते कैद्यांसाठी आयोजित केलेल्या भजन आणि अभंग सादरीकरण स्पर्धेचे! कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्याने रचलेले ‘हे मानवा तू मानवता सोडू नको रे...’ हे काव्य इतर कैद्यांनी सादर करून सर्वांनाच अचंबित केले.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील कैद्यांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी कल्याण जिल्हा कारागृहातील कैद्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत संतरचना सादर केल्या. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’, ‘सद्‌‍ गुरू वाचून सापडेना सोय’ आणि ‘ज्ञानीयाचा राजा’ या रचना कैद्यांनी केल्या.
जिल्हा कारागृह अधीक्षक ए. एस. सदाफुले, तुरुंग अधिकारी भास्कर कचरे, पी. डी. रनाळकर, तसेच शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ, संगीत शिक्षक तुकाराम लोभी आदी
मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तुकोबारायांच्या विचाराने प्रेरित होऊन मानव कल्याणाचा विचार मनात ठेवून संतांनी दाखविलेल्या मार्गाने कैदी भविष्यात मार्गक्रमण करतील. तसेच कारागृहाबाहेरील आयुष्य सुखा-समाधानाने जगतील, असा विश्वास आहे.
- ए. एस. सदाफुले, अधीक्षक, कल्याण कारागृह

कुटुंबप्रमुख आणि कुटुंब व्यवस्था याचा भास कारागृहामध्ये आल्यानंतर होतो. कुटुंबप्रमुख म्हणून कारागृहप्रमुख नेहमीच कैद्यांना वारकरी संप्रदायाच्या शिकवणुकीप्रमाणे घरासारखी वागणूक देतात हेच वारकरी संप्रदायाचे यश आहे. राज्यात जवळपास ६० ते ६५ कारागृह आहेत. यामधील २८ कारागृहांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यामध्ये कैद्यांना संत श्रेष्ठींच्या अभंग रचनांपैकी तीन रचना किंवा सामाजिक विषयावर रचना सादर करण्यास सांगण्यात आल्या होत्या.
- लक्ष्मीकांत खाबिया, स्पर्धा प्रमुख

संतविचार मानवासाठी उपयुक्त
संतांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून वागायला शिकवितात, हे शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने कैद्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे समजले, अशी प्रतिक्रिया सिद्धेश पांचाळ याने व्यक्त केली; तर अमर देसले म्हणाले, अभंग, कीर्तनामुळे तणावमुक्त राहण्यास मदत झाली. या स्पर्धेमुळे जीवनाची नवीन वाट दिसू लागली आहे. कृष्णा गोडांबे म्हणाले, स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे मी आपल्या समाजाची सेवाच करतो आहे, असे मनात भाव दाटून आले आहेत.

स्व. कमलाबाई धारीवाल यांच्या स्मरणार्थ साहित्य भेट
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांना दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, १० जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगांची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फ्रेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी ८२ पुस्तकांचा संच देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84682 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top