शालेय गणवेश महागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय गणवेश महागले
शालेय गणवेश महागले

शालेय गणवेश महागले

sakal_logo
By

वाशी, ता. ५ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ४५९ शाळांची १३ जून रोजी घंटा वाजणार आहे. आठवडाभरात शाळा सुरू होणार असल्याने पालकांची शालेय वस्तू घेण्यासाठी बाजारामध्ये गर्दी होऊ लागली आहे. मात्र महागाईच्या झळा गणवेशासह शालेय वस्‍तूंना बसल्‍यामुळे पालकवर्ग चिंतेत आहेत.
नवी मुंबई शहरात १५ ते १८ घाऊक गणवेश विक्रेते आहेत; तर उपनगरात शेकडो दुकाने आहेत. कोपरखैरणेतील दुकानात कोपरखैरणे, वाशी, सानपाडा या विभागांतील साधारण २५ शाळांचे गणवेश मिळतात. शाळा संचालक व विक्रेत्‍यांच्या हितसंबंधामुळे ठराविक दुकानातूनच पालकांना विद्यार्थ्यांसाठी गणवेश घ्यावा लागतो. गरज असल्याने पालकांना दुकानदारांनी निश्‍चित केलेली रक्कम मोजावी लागते.
मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश, टाय, शूज, मोजे, दप्तर, पाण्याची बाटली, पुस्तके, वह्या असे शैक्षणिक साहित्य पालकांना खरेदी करावेच लागते. काही ठिकाणी शाळा शालेय फीसह अन्य साहित्याकरिता अतिरिक्त शुल्क आकारून गणवेश विद्यार्थ्यांना वितरित करतात.
नवी मुंबईत वर्षभर केवळ शालेय गणवेशाचीच विक्री करणारी खास दुकाने थाटली आहेत. अन्य दुकानांमध्ये शालेय गणवेशांव्यतिरिक्त इतरही कपडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. या बहुभाषिक शहरात शाळा-महाविद्यालये, कॉन्व्हेंटची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक शाळांचा विशिष्ट गणवेश ठरलेला असतो. या अनुषंगाने सुमारे २०० हून अधिक नवनवीन प्रकारचे आकर्षक रंगसंगती असलेले गणवेश बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत.

चढ्या भावाने खरेदीची वेळ
यंदा रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या किमती भडकल्यामुळे वाहतूक खर्चाचा आलेख वधारला. त्यातच तागाच्या भावात ६० टक्के वाढ झाल्याने कपडा महागला. याशिवाय शिलाई आदी खर्चासह तुलनात्मकदृष्ट्या १५ ते १८ टक्क्यांनी चढ्या भावाने गणवेश खरेदी करण्याची वेळ पालकांवर आली आहे. बहुतांशी शाळांमध्ये नियमित गणवेश आणि पीटी गणवेशापोटी तीन ते साडेतीन हजार रुपये पालकांना मोजावे लागत असल्‍याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84716 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top