
महागाईत ‘आहार'' न परवडणारा
पालघर, ता. ५ (बातमीदार) ः जिल्ह्यातील हजारहून अधिक अंगणवाड्यांमधील बालकांना आहार शिजवून देणे बचत गटांनी बंद केले होते. ती जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांवर आली. मात्र, वाढत्या महागाईमुळे केवळ आठ रुपयांत हा आहार प्रत्येक लाभार्थ्याला शिजवून देणे परवडत नसल्याचे सांगत काही प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हे काम बुधवारपासून थांबवले आहे. त्यामुळे बालकांवर परिणाम होणार आहे.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये गरोदर व स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना राबवली जाते; तर सहा वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी पौष्टिक आहार शिजवून दिला जातो. अमृत आहार आधीपासूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत दिला जातो; तर बालकांच्या पौष्टिक आहारासाठी बचत गट नेमण्यात आले होते. अमृत आहार योजनेसाठी ३५ रुपये प्रतिलाभार्थी तर बालकांच्या पौष्टिक आहारासाठी आठ रुपये प्रतिलाभार्थी अनुदान सरकार देते; परंतु पौष्टिक आहारासाठी दिले जाणारे पैसे महागाईच्या तुलनेत कमी असल्याने काही बचत गटांनी हा आहार शिजवणे थांबवले होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर यानंतर बालकांच्या पौष्टिक आहाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती; मात्र त्यांनाही ते परवडणारे नसल्याने जिल्ह्यातील काही प्रकल्पांनी गरम पौष्टिक आहार देणे थांबवले आहे. याआधीच अनेक कामांचा डोंगर अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांवर आहे. त्यात आता अतिरिक्त कामाचा ताण सहन होत नसल्याने काही प्रकल्पांवर हा आहार शिजवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
आहाराचे गणित
एका अंगणवाडीमध्ये किमान वीस लाभार्थी बालकांना गरम ताजा आहार दिला जातो; तर सुमारे पाच ते दहा गरोदर व स्तनदा मातांना अमृत आहार दिला जातो. अमृत आहाराचे ३५ रुपये प्रतिलाभार्थी; तर गरम पौष्टिक आहाराचे ८ रुपये प्रतिलाभार्थी असे ४३ रुपये एका लाभार्थीमागे खर्च करावा लागतो. त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिवसाकाठी पाचशे ते सहाशे रुपये खर्च होतात. खर्चाचे बिल जमा करावे लागते, त्यानंतर त्यांना पैसे मिळतात. आधी सामान आणून खर्च करण्याची त्यांची आर्थिक कुवत नसल्याने त्यांना गरम पौष्टिक आहार शिजवून देणे परवडेनासे झाले आहे.
अन्नधान्य महागले!
१६ मेपासून अंगणवाडी केंद्रातील ३ ते ६ वयोगटातील लाभार्थींना ताजा आहार व गरोदर व स्तनदा मातांना अमृत आहार शिजवून देण्याबाबत सूचना एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी केली आहे. अमृत आहार व ताज्या गरम आहाराचे दर २०१८ मध्ये निश्चित झालेले आहेत. सध्या सर्व कडधान्ये, खाद्य तेलांचे दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. वाढत्या महागाईमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमी पैशात आहार शिजवून देणे शक्य नाही, असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
अंगणवाडी कर्मचारीवर्गाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबत त्यांच्याशी संयुक्त बैठकही आयोजित करण्यात आली होती.
- गणेश मांते, प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, पालघर
अंगणवाडी कर्मचारीवर्गावर आधीच अनेक कामांचा बोजा आहे. त्यात गरम ताजा आहार शिजवून देण्यासाठी तगादा लावला जातो. भीषण महागाईत तो परवडणारा नाही. शासन-प्रशासन नेहमी अंगणवाडी कर्मचारीवर्गाची चेष्टा करते की काय, असा प्रश्न पडत आहे.
- राजेश सिंग, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84747 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..