‘माझी वसुंधरात'' नवी मुंबई अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माझी वसुंधरात'' नवी मुंबई अव्वल
‘माझी वसुंधरात'' नवी मुंबई अव्वल

‘माझी वसुंधरात'' नवी मुंबई अव्वल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा २०२१-२२’ या अभियानात नवी मुंबई महापालिकेला राज्यातील प्रथम क्रमांकाच्या शहराचा बहुमान मिळाला आहे. प्रथम पुरस्काराची १० कोटी रुपयांची रक्कम नवी मुंबई महापालिकेला प्रदान केली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मागील वर्षी ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये नवी मुंबई राज्यातील द्वितीय क्रमांकाचे मानांकित शहर ठरले होते. या वर्षी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून पालिका अभियानास सामोरी गेली आणि राज्यातील सर्वोत्तम पर्यावरणपूरक शहराची मानकरी ठरली. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार सर्व नवी मुंबईकर नागरिकांच्या एकत्रित सहयोगाला समर्पित केला. नवी मुंबई पालिकेतर्फे पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष दिले. मागील दोन वर्षांत दोन लाखांहून अधिक वृक्षरोपे लावण्यात आली. कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये मियावाकी पद्धतीने केलेल्या शहरी जंगल निर्मितीप्रमाणेच या वर्षी सेक्टर २८ नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पद्धतीने एक लाख २३ हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.

रस्त्याच्या कडेला २४ हरित क्षेत्रे विकसित करण्यात आली असून व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना ठिकठिकाणी राबवण्यात आलेली आहे. उल्लेखनीय म्हणजे पालिकेने स्वत:ची रोपवाटिका निर्माण केली आहे. पालिका क्षेत्रात दैनंदिन निर्माण होणाऱ्या १०० टक्के कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. कचऱ्याचे तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ ही संकल्पना राबवण्यात येत असून त्यातून १४८ शिल्पाकृती निर्माण करून शहर सुशोभीकरणात पालिकेकडून भर घालण्यात आली आहे. ‘थ्री आर’ अर्थात कचऱ्याचा पुनर्वापर, कचरा निर्मितीत घट व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. तसेच ‘ग्रीनसोल’ उपक्रमांतर्गत जुने वापरात नसलेले बूट/चप्पल यांचे संकलन करून व त्यांचे नूतनीकरण करून गरजूंना वितरण करण्यात आले आहे.

कचऱ्याची विल्हेवाट
प्रायोगिक तत्त्वावर पाच झोपडपट्ट्यांमधून कचरा संकलित करून त्याची तिथेच कम्पोस्ट पीट्स करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे कचरा वाहतुकीच्या खर्चात बचत होत आहे. तसेच तलावांची नियमित स्वच्छता राखली जात आहे. त्याचप्रमाणे नाले स्वच्छ राहावेत यादृष्टीने नाल्यांच्या काठांवर उंच जाळ्या बसवून नागरिकांनी थेट नाल्यात कचरा टाकू नये यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. नाल्यांमध्ये स्क्रीन्स बसवून कचरा अडवून तो नियमित साफ करण्याची प्रणाली राबवण्यात येत आहे.

वायुप्रदूषणाकडे लक्ष
हवेतील दूषित घटकांचे प्रमाण कमी करण्याप्रमाणेच हवा गुणवत्ता निरीक्षण करून त्यामध्ये सुधारणेसाठी आवश्यक उपाययोजना पालिकेकडून राबवल्या जात आहेत. तसेच डेब्रिजची समस्या मार्गी लावण्यासाठी तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त पद्धतीने बांधकाम व पाडकाम, कचरा विल्हेवाट प्रकल्प राबवला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84764 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top