
५० हून अधिक कलाकारांना कोरोना?
मुंबई, ता. ५ ः प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीत सहभागी झालेल्या ५० हून अधिक बॉलीवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्यापैकी अभिनेता शाहरूख खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, आदित्य रॉय-कपूर यांना कोरोना झाल्याचे निश्चित झाले आहे.
करण जोहरने २५ मे रोजी अंधेरी येथील यशराज स्टुडिओमध्ये आपल्या ५० व्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सहभागी झाली होती. अभिनेता सलमान खान, शाहरूख खान, हृतिक रोशन, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, राणी मुखर्जी, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन, करिना कपूर खान आदी कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते; मात्र आता त्यातील ५० ते ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्टीतूनच कोरोनाचा मोठा फैलाव झाला असल्याचे समजत आहे;
दरम्यान, आज शाहरूख खानला कोरोना झाल्याचे समजताच त्यालाही करण जोहरच्या पार्टीतूनच ही लागण झाल्याचे म्हटले जात आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोना झाला होता. तो या पार्टीत सहभागी नसला, तरी कियारा आडवाणी पार्टीला गेली होती. त्यानंतर त्यांनी एकत्र चित्रपटाचे प्रमोशन केले. त्यातूनच त्याला कोरोना झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, करण जोहरनेही कोरोना चाचणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित असल्याचे समजते आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84771 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..