
कोपरखैरणेमध्ये दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी
कोपरखैरणे, ता. ६ (बातमीदार) : पाण्याची अनियमितता असताना सेक्टर १४ कोपरखैरणे येथील काही सोसायट्यांना पालिकेकडून रविवारी (ता. ५) अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.
आता पाण्याला दुर्गंधीसह फिकट पिवळा रंग आहे, तर पावसाळ्यात काय स्थिती असेल, याचा विचार करणे अवघड आहे. पालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये, असे रहिवासी साहिल कुरेशी यांनी सांगितले. याबाबत रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अविनाश वासुदेवन यांनी तत्काळ ऑनलाईन तक्रार करून पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला व पुढील यंत्रणा कामाला लागली. कोपरखैरणे पालिका विभागीय पाणीपुरवठा उपअभियंता सचिन शिंदे यांच्या पथकाने विभागात कॉस्मो इमारतीला भेट देऊन पाण्याची गुणवत्ता तपासली. तसेच दुर्गंधी व गढूळ पाणी तपासणीसाठी पाठवले असल्याचे सांगण्यात आले.
काही सेक्टरमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये समस्या आहे. रविवारी सकाळपासून मला तक्रारी येत आहेत. आम्ही या प्रकरणी उपाययोजना सुरू केली आहे. पालिकेचे पाणी तपासणी कर्मचारी पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवत आहेत. आम्ही या प्रकरणी गांभीर्याने लक्ष ठेवून आहोत, असे पालिका विभागीय अधिकारी प्रशांत गावडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84817 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..