पूरस्थिती टाळण्यासाठी फ्लड गेट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूरस्थिती टाळण्यासाठी फ्लड गेट्स
पूरस्थिती टाळण्यासाठी फ्लड गेट्स

पूरस्थिती टाळण्यासाठी फ्लड गेट्स

sakal_logo
By

किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : मुंबईत भरतीच्या वेळेत शिरणारे पाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून पहिल्यांदाच ऑटोमायझेशनच्या ‘स्काडा’ तंत्रज्ञानावार आधारित फ्लडिंग गेट यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मिठी नदीला आऊटलेट असल्या, तरी मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण २६ ठिकाणी हे फ्लडिंग गेट्स लावण्यात येणार आहेत. शहरात स्वयंचलित स्वरूपाचे गेट्स बसवण्याचा हा पहिलाच प्रकल्प असेल. मुंबईत पूरस्थिती टाळण्यासाठी पालिकेने या फ्लडिंग गेट्सच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा पद्धतीची उपाययोजना करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात शहरात शिरणारे पाणी रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होईल. सध्या जपान, कोरिया यांसारख्या देशात ऑटोमायजेशनची पद्धत असलेले फ्लडिंग गेट्स आहेत.
मुंबईत अतिवृष्टी आणि समुद्राच्या भरतीमुळे अनेकदा पूरस्थिती निर्माण होते. शहरात भरतीच्या वेळेत पाणी शिरू नये म्हणूनच हे फ्लडिंग गेट्स बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरसू यांनी दिली. भरतीच्या वेळेत समुद्रातील पाणी शहरात उलटे फिरू नये म्हणून ही फ्लडिंग गेट्सची उपाययोजना आहे. मुंबईत पहिल्यांदाच असा प्रयोग होणार आहे, ज्यामध्ये ऑटोमायजेशन आणि सेन्सरवर आधारित तंत्रज्ञानातून फ्लडिंग गेट्स हे शहरात येणारे पाणी रोखून धरू शकतील. सध्या मुंबईत अनेक भागात पालिकेने बसवलेले फ्लडिंग हे मेकॅनिकल पद्धतीने वापरण्यात येतात; तर दुसरीकडे शहरात त्याच वेळी अतिवृष्टी झाल्यास शहरात साचणारे पाणी हे मिठी नदीत पंप लावून टाकण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल वाहतुकीवर परिणाम
मिठी नदीचा भरतीच्या पाण्याच्या प्रवाह असलेले क्षेत्र हे ७.५ किलोमीटर इतके मोठे आहे. भरतीच्या वेळेत सीएसएमटी रोड ते माहीम कॉजवेपर्यंत हे समुद्राचे पाणी उलटे या भागात येत असते. त्यानंतर ओहोटीच्या वेळी ते पुन्हा समुद्रात जाते. त्या वेळी मिठी नदीचे २६ आऊटफॉल्स पाण्याने बंद होतात. परिणामी उपनगरीय लोकल वाहतुकीवर याचा परिणाम होताना मध्य रेल्वेवरील सायन-कुर्ला यांसारख्या भागात रेल्वेरूळ पाण्याखाली जातात. आता २६ ठिकाणी फ्लडिंग गेट्स लावण्यात येणार असल्याने पूरस्थिती आटोक्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे.

मानवी हस्तक्षेप कमी होणार
१) मिठी नदीचे क्षेत्र हे भरतीच्या (टायडल) झोनमध्ये येते. नदीच्या एकूण २६ आऊटफॉलच्या ठिकाणी हे फ्लडिंग गेट्स बसवण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३ पम्पिंग स्टेशनचाही वापर करण्यात येईल. सेन्सरवर आधारित पम्पिंग यंत्रणा ‘स्काडा’ प्रणालीने कार्यरत होतील. सध्या अशा पद्धतीचे तंत्रज्ञान हे जपान आणि कोरिया या देशात वापरण्यात येते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे.
२) पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी ऑटोमायझेशनचे तंत्रज्ञान वापरणारी मुंबई ही पहिलीच महापालिका ठरणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये या प्रकल्पासाठीची निविदापूर्व बैठक पार पडेल, अशी माहिती पालिका पर्जन्य जलवाहिन्या विभागाचा उपमुख्य अभियंता विभास आचरेकर यांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच ऑक्टोबरपासून या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

फ्लडिंग गेट्सचा प्रकल्प
१) ऑटोमाईज पद्धतीचे फ्लडिंग गेट्स आणि पंप हे पाऊस पडल्यावर स्वयंचलित पद्धतीने सुरू होतील. सध्या इतर देशात वापरात असलेले पंप हे कोरिया तसेच जपानमध्ये तयार करण्यात आले आहेत. मिठी नदीसाठी मुंबई शहरात ९; तर पूर्व उपनगरात १७ ठिकाणी फ्लडिंग गेट्स बसवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेने दोन झोनमध्ये निविदा मागवली आहे.
२) मिठी नदीवर मोठे पम्पिंग स्टेशन बसवणे शक्य नाही; परंतु नदीचे पाणी भरतीच्या वेळेत थांबवणे शक्य आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मल सोडले जाते. ‘ड्राय वेदर इन्टरसेप्ट टायडल आऊटफॉल’च्या माध्यमातून मलनिस्सारणाची वेगळी वाहिनी तयार करण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच ही वाहिनी सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्टला वळवण्याचही पालिकेचा मानस आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84881 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top