
बचत गटातून महिलांना रोजगार
भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना सहजपणे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बचत गटाच्या प्रतिनिधींनी स्थानिक बाजारपेठेची गरज लक्षात घ्यावी. मुंबई-ठाण्याला भाजीपाल्याबरोबरच दुधाची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. या बाजारपेठेतून बचत गटांना सहज उत्पन्न मिळेल. त्यासाठी ब्रॅण्ड विकसित करण्याबरोबरच कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले.
कपिल पाटील फाऊंडेशन व क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन यांच्या वतीने महिला बचत गटांचे बळकटीकरण व महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी भिवंडीत रविवारी सायंकाळी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील बोलत होते.
जिल्ह्यातील महिलांच्या प्रगतीसाठी अस्तित्वातील बचत गटांचे सक्षमीकरण करण्याबरोबरच नव्याने बचत गट स्थापन करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांबरोबरच ‘एम एसआरएलएम’च्या योजनांचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात बचत गट चळवळ सक्षम व्हावी, यासाठी कपिल पाटील फौंडेशनकडून मदत केली जाईल, असे आश्वासन खासदार कपिल पाटील यांनी दिले.
या वेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, शहर अध्यक्ष ममता परमाणी, माजी सभापती रवीना जाधव, जयश्री चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे आदी उपस्थित होते. पेण येथील क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या श्रीमती माळी, दिनेश माळी यांनीही कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84912 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..