
रेल्वे स्थानक समस्यांचे आगार
घणसोली, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील कोट्यवधी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. घणसोली रेल्वे स्थानकातील पाणी, घाण वाहून नेणाऱ्या चेंबरची झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चालताना या झाकणात पाय अडकून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे स्थानकातील समस्यांचा प्रवाशांना त्रास होत आहे. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
घणसोली रेल्वे स्थानकाला अनेक समस्यांनी घेरले असून प्रवाशांना या समस्यांचा दिवसेंदिवस त्रास होत आहे. पाणीगळती, बंद पंखे, स्थानक परिसरात अंधार, रेल्वेरूळ ओलांडून नागरिकांचा जीवघेणा प्रवास आणि आता चेंबरची झाकणे तुटल्याने घणसोली रेल्वे स्थानक समस्यांचे भांडार झाले आहे. घणसोली रेल्वे स्थानकात पाणी वाहून नेणाऱ्या चेंबरची झाकणे तुटली असल्याने रेल्वे पकडण्याच्या नादात घाईत असल्याने प्रवाशांना या झाकणात पाय अडकून पडण्याची शक्यता निर्माण होत आहे. या परिसरात सर्वत्र पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याचे चित्र पाहायला मिळते.
घणसोली रेल्वे स्थानकात भिकाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. विविध कंपनीचे सेल्समन घणसोली रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवाशांची अडवणूक करून आपल्या योजनेबद्दल माहिती देत असल्याने प्रवासी या सर्व गोष्टींना वैतागले आहेत. प्रशासनाच्या बेजाबदारपणे रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
एव्हीटीएम बंद
रेल्वे स्थानकात असलेले एव्हीटीएमचे प्रिंटरदेखील खराब झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना अर्धा तास तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागते.
गेल्या काही दिवसांपासून घणसोली रेल्वे स्थानकात समस्यांमध्ये वाढ होत चालली आहे. सिडकोने आणि रेल्वे प्रशासनाने या समस्येची तत्काळ दखल घ्यावी.
- दिनेश डांगे, प्रवासी
घणसोली रेल्वे स्थानकाला वेढलेल्या समस्यांबद्दल वारंवार सिडको विभागाला माहिती देण्यात आली आहे. वारंवार संपर्क करण्यात आला आहे; परंतु अद्यापही काही सुधारणा करण्यात आलेली नाही.
- संजय सावंत, स्टेशन मास्टर, घणसोली
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84934 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..