
कारशेडचे दोन प्रस्ताव एमएमआरडीएने फेटाळाले
भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : भाईंदर मेट्रोच्या नियोजित कारशेडला पर्याय म्हणून ग्रामस्थांनी सुचवलेल्या तीन जागांच्या प्रस्तावांपैकी दोन जागांचे प्रस्ताव एमएमआरडीएने फेटाळून लावले आहेत. या दोन्ही जागांवर कांदळवन व सीआरझेड असल्यामुळे या जागी कारशेड बांधणे शक्य नसल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले. भाईंदर मेट्रो मार्गाच्या संदर्भातील पर्यावरणीय व सामाजिक बाबींवर चर्चा करण्यासाठी एमएमआरडीएने एका खुल्या चर्चासत्राचे मंगळवारी भाईंदर येथील नगरभवन सभागृहात आयोजन केले होते. या चर्चासत्रात उपजिल्हाधिकाऱ्यांनी याचा खुलासा केला.
एमएमआरडीए प्रकल्पाचे सामाजिक परिणाम निर्धारण व पर्यावरण परिणाम मूल्यमापन अहवाल तयार करत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे तपशील सादर करण्यासाठी तसेच त्यावरील विचार आणि सूचना प्राप्त करणे हे चर्चासत्राचे उद्दिष्ट होते; परंतु चर्चासत्रासाठी जमलेल्या ग्रामस्थांनी हे चर्चासत्र कारशेडच्या भूसंपादनासाठी अधिसूचना काढण्याआधी होणे आवश्यक होते, असा पवित्रा घेत आधी कारशेडसंदर्भात काय कार्यवाही सुरू आहे आणि ग्रामस्थांनी नियोजित कारशेडसाठी सुचवलेल्या तीन पर्यायांवर एमएमआरडीएने काय विचार केला आहे, याचा आधी खुलासा करण्याचा आग्रह धरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. त्यावर उपजिल्हाधिकारी व मेट्रोच्या भूसंपादनाची जबाबदारी असलेल्या देवेंद्र कटके यांनी कारशेडच्या विषयाला नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती दिली असल्यामुळे त्यावर सध्या कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याचे सांगितले.
ग्रामस्थांनी सध्याच्या राई गावामागील कारशेडला विरोध करून हे कारशेड स्थलांतरित करण्यासाठी तीन जागांचा पर्याय एमएमआरडीएला दिला आहे; मात्र त्यापैकी राज्य सरकारच्या जागेवर सीआरझेड; तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दुसऱ्या जागेवर कांदळवन तसेच सीआरझेड असल्यामुळे या ठिकाणी बांधकाम करणे शक्य नाही. त्यामुळे हे दोन्ही पर्याय कारशेडसाठी योग्य नसल्याचे कटके यांनी सांगितले. विशेष म्हणजे यापैकी एक पर्याय खुद्द आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील सुचवला होता.
ग्रामस्थांचे असमाधान
१) ग्रामस्थांनी तिसरा पर्याय राधास्वामी सत्संगच्या जागेचा सुचवला होता; मात्र या जागेवर कारशेड उभारण्यासाठी तब्बल १४०० कोटी रुपयांचा खर्च आहे आणि या जागेसंदर्भात कारशेडच्या विषयावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाईल, असे आश्वासन कटके यांनी दिले; मात्र हे मुद्दे ग्रामस्थांना पटले नाहीत.
२) एमएमआरडीएचे अनेक प्रकल्प कांदळवन आणि सीआरझेडमध्ये सुरू आहेत. त्या ठिकाणी आवश्यक त्या परवानग्या एमएमआरडीएला मिळाल्या आहेत. मग भाईंदरच्या कारशेडसंदर्भातच हा मुद्दा कसा अडचणीचा ठरतो, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून करण्यात आला. पर्यावरणासंदर्भातही ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर एमएमआरडीएला स्पष्टीकरण देता आले नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84941 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..