दोन वर्षात श्‍वानदंशाचे प्रमाण घटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षात श्‍वानदंशाचे प्रमाण घटले
दोन वर्षात श्‍वानदंशाचे प्रमाण घटले

दोन वर्षात श्‍वानदंशाचे प्रमाण घटले

sakal_logo
By

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत नवी मुंबई महापालिका हद्दीत श्‍वानदंशाच्या घटनांमध्ये घट झाली होती. गेल्या वर्षी कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे; मात्र मागील पाच वर्षांच्या तुलनेत नागरिकांना श्वानदंश झाल्याच्या केसेस दोन वर्षांत कमी झाल्या आहेत.

नवी मुंबई शहरातील रस्ते, कचराकुंड्या, सिडको वसाहती, झोपडपट्टी आदी भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी पकडून नेतात. त्यांची नसबंदी करून पुन्हा त्यांना परिसरात सोडून देतात. तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसून येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये भटकी कुत्री मोकाट फिरत असतात. नवी मुंबईसारख्या सायबर सिटीत पालिका रुग्णालयात वर्षाला तब्बल ८ ते १० हजार श्वानदंश झालेले रुग्ण दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पालिकेतर्फे श्वानांना अॅन्टीरेबीज लस दिली जात असते. ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत पालिका हद्दीतील कुत्रे पकडून आणून त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. तसेच त्यांना रेबीजची लसही दिली जाते; मात्र श्वानदंश झालेल्या रुग्णांची वर्षभरातील संख्या पाहता महिन्याला किमान दीडशे रुग्ण श्वानदंशासाठी उपचार घेण्यासाठी येत आहेत. ही संख्या फार मोठी आहे. तसेच तितकीच गंभीरही आहे. गेल्या सात वर्षांत सुमारे ६८ हजार ७५४ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची नोंद झाली. त्यामुळे शहरात श्‍वानांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे. २०२०-२१ या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सात हजार ७७२ श्वानदंशाची नोंद पाहता २०१६-१७ मध्ये १४ हजार ५४६ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद ही दुप्पट होती.

पालिका हद्दीबाहेरील रुग्णांचे प्रमाण अधिक
वाशी येथील पालिका रुग्णालयात श्वानदंशाच्या रुग्णांची संख्या महिन्याला दीडशे-दोनशेने वाढत आहे; मात्र पालिका रुग्णालयात उपचारांसाठी पालिका हद्दीबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या ४० ते ५० टक्के आहे. त्यामुळे श्वानदंशाचे पालिका हद्दीबाहेरील रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते. नवी मुंबई पालिकेला लागून असलेल्या पनवेल शहराचा ग्रामीण भाग, उरण परिसर आणि मुंबईतील मानखुर्द, गोवंडीमधून येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

२४ तास सेवा उपलब्ध
जखमी व रोगट श्वान तक्रारीच्या निवारणासाठी २४ तास सेवा आणि रुग्णवाहिनी उपलब्ध आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, दोन मोठी व एक लहान वाहने महापालिकेच्या श्वान नियंत्रण केंद्रात कार्यरत आहेत.

वर्ष श्‍वानदंश
२०१६-१७ १४,५४६
२०१७-१८ १३,७८३
२०१८-१९ १२,२९५
२०१९-२० १०,४८२
२०२०-२१ ७,७७२
२०२१-२२ ९,९६१

महापालिकेच्या श्वान नियंत्रण केंद्राच्या माध्यमातून शहरातील भटक्या आणि मोकाट श्वानांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. तसेच काही रुग्ण हे नवी मुंबई हद्दीबाहेरीलदेखील आहेत.
- डॉ. प्रमोद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84944 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top