गायमुख उन्नत मार्ग दृष्टिक्षेपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायमुख उन्नत मार्ग दृष्टिक्षेपात
गायमुख उन्नत मार्ग दृष्टिक्षेपात

गायमुख उन्नत मार्ग दृष्टिक्षेपात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नियोजित असलेला गायमुख उन्नत मार्गाचा प्रकल्प आता दृष्टिक्षेपात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये वन्यजीव मंडळाने गायमुख उन्नत मार्गाला त्वरित मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संबंधित सर्व विभागाची पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरी देत लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
ठाणे ते मिरा-भार्इंदरदरम्यानचा घोडबंदर मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होतात ते गायमुख घाटात. गायमुख येथील चढणीच्या वळणदार घाटामध्ये अवजड वाहने बंद पडतात; तर टँकर पलटी होऊन वारंवार अपघात घडत असतात. याचा फटका ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि गुजरातकडून येणाऱ्या वाहतुकीला बसत असून, पर्यायाने ठाणे शहरालाही अनेक वेळा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी ४.५ किलोमीटर लांबीचा गायमुखजवळ उन्नत मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
२०१८ मध्ये राज्य सरकारकडून त्याला मंजुरीही मिळाली; मात्र उड्डाणपूल उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा वन विभागाच्या अखत्यारीत असून त्यांच्याकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळत नव्हती. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी तातडीने वाईल्डलाईफची जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव पुढे आला. यासंदर्भातील सर्व सोपस्कार पार केल्यानंतर सोमवारी (ता. ६) पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेनुसार वन्यजीव मंडळाने गायमुख उन्नत मार्गाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यासंदर्भात एमआयडीसी, वनविभाग वन्यजीव मंडळ यांची पुन्हा बैठक होणार असून, सुधारित आराखड्याची चाचपणी केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

यापूर्वी सुधारित प्रस्ताव
एमएसआरडीसीने तयार केलेल्या गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंतच्या उन्नत मार्गातील वन विभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एमआयडीसी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी उन्नत मार्ग वळणदार न करता तो सरळ व चार बाय चार लेनचा असावा, अशा सूचना एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुधारित प्रस्ताव बनवून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागास सादर करण्यात आला; मात्र पुढे या मार्गामुळे वन्यजीवांना धोका निर्माण होण्याचे कारण पुढे करण्यात आले.

ॊॊ‘डीपीआर’वर समक्ष चर्चा
उन्नत मार्ग वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रमुख मुद्दा डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसारच एमआयडीसीने सुधारित आराखडा तयार केल्याचा दावा केला आहे. हा आराखडा वन्यजीव मंडळाकडे सादर करण्यात आला असला तरी सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष पुन्हा त्यावर फेरविचार करण्यात येणार आहे. दरम्यान, उड्डाणपूल उभा करताना कास्टिंग गार्ड उभे करू नये, प्री-फॅब्रिकेटेड यार्ड उभारू नये, अशा काही महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही होणार आहे; मात्र तोपर्यंत कामाची इतर प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84945 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top