पावसाळी वस्तूंच्या खरेदीची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळी वस्तूंच्या खरेदीची लगबग
पावसाळी वस्तूंच्या खरेदीची लगबग

पावसाळी वस्तूंच्या खरेदीची लगबग

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ (बातमीदार) : पावसाच्या आगमनाआधीच छत्र्या, चपला, रेनकोट अशा पावसाळी वस्तूंच्या खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. तेव्हा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच ठाणे शहरातील बाजारपेठा पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंनी सजल्या असून त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेतील लगबग वाढली आहे.
ठाण्यातील जांभळी नाका येथील मुख्य बाजारपेठ पावसाळ्यानिमित्ताने रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट, आणि नवनवीन डिझाईनच्या पावसाळी चपलांनी सजली आहे. जून महिना उजाडला असूनही ठाण्यासह आसपासच्या शहरात पावसाची प्रतीक्षा असली तरी पावसाळी खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. सध्या ठाणे शहरातील छत्री विक्रेत्यांकडे १५० ते १००० रुपयांपर्यंत मोठ्या आणि लहान आकाराच्या छत्र्या उपलब्ध आहेत. महिलावर्गाकडून दुमडून ठेवता येणाऱ्या छत्र्यांच्या खरेदीला अधिक पसंती मिळत असून त्यांच्या किमती १५० ते ८०० रुपयांपर्यंत आहेत; तर लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टूनची चित्रे असणाऱ्या छत्र्यादेखील उपलब्ध असून त्यांच्या किमती ८० ते १०० रुपयांपासून सुरू आहेत. यंदा छत्री तयार करण्यासाठी लागणारे कापड, तारेंचे सांगाडे इत्यादी महागल्याने तसेच त्यांची उपलब्धतादेखील कमी झाल्यामुळे छत्र्यांच्या किमतीतही यंदा ४० ते ५० रुपयांपर्यंतची वाढ झालेली आहे. तसेच रेनकोटसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या किमतीतही वाढ झाल्यामुळे यंदा त्यांच्या किमती जवळपास १०० रुपयांनी वाढलेल्या आहेत.
शहरातील बाजारपेठेत शूज, सॅंडल, स्लीपर अशा महिलांच्या पावसाळी चपलांच्या प्रकारांमध्ये यंदा नवनवीन डिझाईन विक्रीसाठी दाखल झाल्या असून महिलांनी जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाळी चपलांची खरेदी सुरू केली आहे. सध्या महिलांच्या पावसाळी चपला २५० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या चपला १००; तर पुरुषांच्या चपला ३०० रुपयांपासून सुरू असून पावसाळी चपलांच्या खरेदीसाठी ग्राहकवर्गाचा ओढा आहे.

इंधन दर, छत्री-रेनकोटसाठी वापरण्यात येणाऱ्या कापडाचे दर बरेच वाढलेले आहेत, याचा परिणाम यंदा छत्री आणि रेनकोटच्या किमतींवर पडलेला आहे. या वर्षी २० ते ३० टक्क्यांनी पावसाळी वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. पावसाळा लांबल्यामुळे केवळ सुट्टीच्या दिवशीच ग्राहक पावसाळी वस्तूंची खरेदी करीत आहेत.
- मुकेश कुमार, विक्रेते
वस्तूंच्या किमती (रुपयांमध्ये)

वस्तू आधी आता

लहान छत्री ८० १००
महिलांच्या छत्री मोठी १०० १५०
महिलांची फोल्डिंग छत्री २०० २५०
पुरुषांची छत्री १०० १५०
रेनकोट (लहान मुले) २०० ३००
रेनकोट (महिला) ४०० ५००
रेनकोट (पुरुष ) ५०० ६००
चपला (महिला) २५० ३००
चपला (पुरुष) २५० ३००
चपला (लहान) १०० १५०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84955 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top