
मोखाड्यात दुबार पेरणीचे संकट
मोखाडा, ता. ७ (वार्ताहर) ः डोंगराळ आदिवासी तालुक्यांमध्ये भात, नागली आणि वरई ही तीन मुख्य नगदी पीके घेतली जातात. यामधील हळव्या पीकाची मृग नक्षत्रात धूळवाफेवरची सुमारे ३० ते ४० टक्के पेरणी झाली आहे; मात्र अद्यापही पाऊस न बरसल्याने आणि तीव्र उनामुळे पेरलेले बियाणे खराब होण्याची तसेच जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन लांबल्याने मोखाड्यातील शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी आणि डहाणू या तालुक्यांमध्ये भात, नागली आणि वरई ही तीन मुख्य नगदी पिके घेतली जातात. ही पिके घेण्यासाठी शेतकरी शेताची बांधबंधिस्ती, राब भाजणीची तयारी दोन महिन्यांपासून करतो. हळवे पिकांच्या पेरणीला मृग नक्षत्रात सुरुवात करतो. त्यादृष्टीने या वर्षी २४ मेनंतर मृग नक्षत्रात या भागात ३० ते ४० हळव्या पिकांची पेरणी केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७५ हजार हेक्टर भात पिकाचे क्षेत्र आहे. त्याखालोखाल १५ हजार हेक्टर नागली आणि वरईचे १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. या पेरणीनंतर कुठेही पावसाच्या सरी बरसल्या नाहीत. दरम्या,न पेरणी केलेल्या बियाण्याला आठवडाभरात पाणी न मिळाल्यास ते खराब होण्याची तसेच उनामुळे जळून जाण्याची भीती असते. मृगात धूळवाफेवर केलेल्या पेरणीला १२ दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे खराब होऊन उनामुळे जळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. दरम्यान, शासनाकडून पाऊस सुरू झाल्यानंतरच भात पिकाची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
गेल्या वर्षीच्या तुलनेने बियाणे तसेच खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता धूळवाफेवरची पेरणीही वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. पुन्हा बियाणे विकत घेणे, खते घेणे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
तालुक्यात ३० ते ४० टक्के धूळवाफेवरची पेरणी झाली आहे. पेरणीनंतर आठ ते १० दिवसांत पाऊस न झाल्यास हे बियाणे खराब होते. तसेच भात पिकाची पेरणी पाऊस सुरू झाल्यावर केली जाते. त्यामुळे धूळवाफेवरची पेरणी वाया गेल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
- सुनील पारधी, तालुका कृषी अधिकारी, मोखाडा
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84965 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..