
काँग्रेसची शिवसेनेवर टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः ठाण्यात एसआरए व क्लस्टरसारखे प्रकल्प येऊनही ठाणे अजूनही झोपडपट्टीमुक्त होत नाही. त्याला पूर्णतः ठाणे महापालिका प्रशासन व अनेक वर्षांपासून सत्तेत असलेला सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ७) केला. काँग्रेसच्या वतीने मागील आठवड्यापासून महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीबाहेर आंदोलन करण्यात आले. मंगळवारी उथळसर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर शहर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अपूर्ण नालेसफाई, अनधिकृत बांधकामावर कारवाईकरिता आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी चव्हाण बोलत होते.
याप्रसंगी अॅड. विक्रांत चव्हाण यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, की प्रत्येक वर्षी चुकीच्या पद्धतीच्या नालेसफाईबाबत जनता आवाज उठवत आहे. सध्या चालू असलेल्या चुकीच्या नालेसफाईमुळे यावेळेसही ठाण्यातील विविध भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. महापालिका अधिकारी वर्ग नालेसफाई व इतरही कामांची वस्तुस्थिती आयुक्तांसमोर येऊ देत नाही. अनधिकृत बांधकामांवर थातुरमातुर कारवाईचा फक्त फार्स करण्यात येतो. कोणतेही बांधकाम समूळ नष्ट करण्यात येत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. या आंदोलनाची सांगता १४ जूनला महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करून करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84997 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..