
रानफळांची आवक घटली
विरार, ता. ८ (बातमीदार) ः उन्हाळा आला की बाजारात अनेक जंगली फळे पाहायला मिळतात. आंबे, करवंद, आवळा, जांभळे याबरोबरच हाटूरणे, तोरणे, भोकर, रांजणे या फळांनी बाजार नटलेले दिसतात; परंतु यंदा ही जंगली फळे बाजारात तितक्या प्रमाणात दिसत नाहीत. याचे कारण आहे बेसुमार जंगलतोड. विशेषतः आदिवासी समूहातील लोक या फळांचा व्यवसाय करतात; पण आता या फळांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा व्यवसायही धोक्यात आला आहे. आवक घटल्याने हाटूरणे, तोरणे आणि भोकरे या फळांच्या किमती वाढल्या आहेत.
रानावनात अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करून राहिलेला कष्टकरी व आदिवासी समाज वनसंपदेवर आपली उपजीविका आजही चालवतो. उन्हाळ्यात मध, करवंदे, हाटूरणे, गावठी आंबे, तोरणे, पायरी, पिंपळाची फळे, आवळा, रान फणस, ताडगोळे, तोरणे, जाम, जांभळे गोळा केली जातात. ही फळे आदिवासी बाजारात येऊन विकतात. वर्षातून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे सध्या वसईच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा रानमेवा खरेदीकडे कल दिसून येत आहे. खेड्यापाड्यातून आलेल्या महिला टोपल्यातून फळे विकायला बसलेल्या बाजारात दिसत आहेत.
उन्हामुळे शरीराची काहिली होत असताना ही फळे खूप लाभदायक ठरतात. औषधी गुणांनी युक्त असलेली ही रानफळे वेगवेगळ्या रोगांवर गुणकारी मानली जातात. या रानमेव्याचा भाग असलेली करवंदे आदिवासींना एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत साधारणपणे अडीच महिने रोजगार मिळवून देतात. करवंदे खुडणे हे अत्यंत कष्टाचे काम असून उन्हाची परवा न करता जंगलातील झाडाझुडपांत जाऊन एकेक करवंद खुडून टोपली भरण्यासाठी पूर्ण दिवस जातो. खुडलेली करवंदे बाजारात विकण्यासाठी आणण्यास आणखी एक दिवस घालवावा लागत असल्याचे करवंद विक्रेत्या ताराबाई भुरकुंड यांनी सांगितले.
----------------
वसईच्या बाजारात १० रुपये एक वाटा या दराने करवंदे, जांभूळ आणि रांजणे विकली जातात. एका टोपलीत साधारणपणे ५० ते ६० वाटे असतात. त्यानुसार दिवसभरात ४५० ते ५०० रुपये त्यांना मिळत
आहेत.
- बारकूबाई बिस्तूर, रानमेवा विक्रेत्या
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85070 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..