
पावसाळ्यापूर्वी खरेदीसाठी झुंबड
कासा, ता. ८ (बातमीदार) ः पावसाळा सुरू होणार असल्यामुळे ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडा बाजारात सध्या मोठी गर्दी उसळली आहे. म्हणून खेड्यापाड्यांतून तसेच दुर्गम भागातील आदिवासी नागरिक पावसाळ्याच्या दिवसांत लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात गर्दी करीत आहेत. तांदूळ, तेल, मिरची, मसाला, कांदे, सुके मासे, कडधान्य घेण्यासाठी झुंबड उडाली आहे.
या खरेदीबरोबरच कोंबड्या पाळण्यासाठी कपूर, सूप, कपडे, घरावर टाकण्यासाठी प्लास्टिक या गोष्टी खरेदी केल्या जात आहेत. कासा, गंजाड, सायवन, उधवा, डहाणू, आशागड, धुंदलवाडी येथील आठवडी बाजार गर्दीने फुलले आहेत. या बाजारात मुंबई, ठाणे, गुजरात, नाशिक येथील विक्रेते आपला माल घेऊन येत असतात. त्यामुळे आवश्यक असणाऱ्या सगळ्याच वस्तू या बाजारात मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक कुटुंबकबिल्यासह खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. एकदा पावसाने सुरुवात केली की मग हे आठवडा बाजार बंद होतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या शेवटच्या खरेदीसाठी हे बाजार गर्दीने फुलले आहेत.
------
पावसाळ्यात आम्हाला आमच्या गावातून खरेदी करण्यासाठी यायला जमत नाही. म्हणून आताच जे महत्त्वाचे सामान लागेल ते खरेदी करून ठेवत आहोत. डाळी, सुके मासे, तेल, मसाले यांची खरेदी जास्त केली जात आहे. एकदा शेतीकाम सुरू झाले की यायला जमत नाही.
- सुरेश कर्मोडा, शेतकरी, जामशेत.
---
बहुतेक हा शेवटचा बाजार आहे. यानंतर दिवाळीच्या आसपास पुन्हा हे बाजार सुरू होतील. त्यामुळे आतापर्यंत जी कमाई केली आहे, त्यावर पावसाचे चार महिने काढावे लागणार आहेत.
- शामलाल बृज-विक्रेता
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85125 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..