
ग्रामीण भागात धोक वाढला
ठाणे, ता. ९ ः ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर निर्बंधातदेखील शिथिलता आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. असे असताना, मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ४०० पार झाला होता. यामध्ये सर्वाधिक रुग्ण जरी शहरी भागातील असले, तरी ग्रामीण भागातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात दिवसाला २० ते २५ रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे कल्याण तालुक्यातील निळजे भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या ग्रामीण भागातील ८० सक्रिय रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे हे रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. केवळ दोनच रुग्णांवर पालिकेच्या करोना केंद्रांवर उपचार सुरू आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी ही रुग्णवाढ रोखण्यासाठी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे.
चाचण्यांमध्ये वाढ
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ग्रामीण भागात दिवसाला ९० ते १०० जणांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या; परंतु आता पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या दिवसाला १५० ते २०० चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच पुढील काही दिवसात या चाचण्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘हर घर दस्तक अभियान २’ मोहीम पुन्हा राबवणार
ग्रामीण भागात अद्यापही अनेक नागरिक असे आहेत की, त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. या नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी ‘हर घर दस्तक अभियान २’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित असलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केंद्रावर लसीकरण करून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण सत्र प्रमुख डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.
तालुका रुग्ण
अंबरनाथ ००
कल्याण ६८
भिवंडी ०७
शहापूर ०३
मुरबाड ०२
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85223 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..