
कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्या
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा व अग्निशमन विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
महापालिकेत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचऱ्यांना किमान वेतनासह अन्य सुविधा देणारी मिरा-भाईंदर पालिका ही राज्यातील एकमेव महापालिका असल्याचे गौरवोद्गार विवेक पंडित यांनी काढले. मात्र, महापलिकेच्या पाणीपुरवठा व अग्निशमन विभागातील काही कंत्राटी कर्मचारी अद्याप किमान वेतनापासून वंचित असल्याचे पंडित यांनी निदर्शनास आणून त्यांना हा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली. याव्यतिरिक्त महापालिकेची महासभा सुरू असताना अनोळखी व्यक्तीने सभागृहात प्रवेश केल्याप्रकरणी निलंबित केलेले महापालिका कर्मचारी मधुकर भोईर यांना पुन्हा कामावर घेणे, महापालिकेत लघुलेखनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणे आदी विविध मागण्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेळोवेळी झालेल्या निर्णयांची माहिती जाणीवपूर्वक संघटनेला देण्यात येत नाही, संघटनेने केलेल्या पत्रव्यवहाराला आस्थापना अधीक्षक सुनील यादव उत्तर न देता संघटनेला सापत्न वागणूक देत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. त्यावर आस्थापना अधीक्षकांना योग्य ती समज देण्यात येईल, तसेच संघटनेने केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्यांची पूर्तता आधीच करण्यात आली आहे, शिल्लक राहिलेल्या मागण्यांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आयुक्त दिलीप ढोले यांनी यावेळी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85257 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..