
अंबरनाथला दोन गोदामे जळून खाक
अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) ः पाले परिसरातील दोन गोदामांना बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच आनंदनगर एमआयडीसी, बदलापूर, उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या गोदामांमध्ये स्वच्छतेसाठीची द्रव्य आणि रंगाचा मोठा साठा असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
पाले गावाच्या जागेत नव्याने औद्योगिक वसाहत निर्माण झाली असून त्याला लागून मोठी नागरी वसाहत उभी राहिली आहे. येथे आनंद सागर रिसॉर्टच्या मागील बाजूस एलको पेंट आणि बॉम्बे हायजीन या कंपन्या असून तेथे रंग आणि स्वच्छतेसाठी वापरली जाणारी द्रव्ये तयार केली जातात. या कारखान्यांना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने नागरी वस्तीत भीती पसरली होती. नागरिकांना या कारखान्यातील पिंपाचे मोठमोठे स्फोट ऐकू येत होते. या घटनेची माहिती मिळताच आनंदनगर एमआयडीसी, बदलापूर, उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाकडून देण्यात आली. गोदामात ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकत होती. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास वेळ लागल्याचे अग्निशमन दलाने सांगितले; तर गोदामाला रात्री आग लागल्याचे समजल्याने शेजारील रहिवासी संकुलातील नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85266 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..