
माजी नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तपासूनच संधी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नुकतेच प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यातच अनेक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीलादेखील सुरुवात केली आहे. भाजपने मोर्चेबांधणीबरोबरच माजी नगरसेवकांचे पाच वर्षांतील प्रगतिपुस्तक तपासणे सुरू केल्याचे वृत्त आहे. या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्याबाबतचा विचार या प्रगतिपुस्तकाच्या आधारे केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पाच वर्षांत प्रभागात किती विकासकामे केली, याचा आढावा घेण्याबरोबरच या नगरसेवकांच्या बाजूने किती जनमत आहे, याची चाचपणीदेखील केली जाणार आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढू लागला आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गज माजी नगरसेवकांची अडचण निर्माण झाली असल्याने सर्वच पक्षांत यामुळे स्पर्धा निर्माण होणार आहे. ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचे २४ नगरसेवक निवडून आले होते. ही संख्या वाढवण्याचा निश्चय भाजपने केला असून यासाठी थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नाराज शिवसैनिकांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपचे जे माजी नगरसेवक आपल्याला पुन्हा तिकीट मिळेल, या आशेवर आहेत, त्यांचा गेल्या पाच वर्षांतील ‘परफॉर्मन्स’ बघूनच त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्रभागांची तोडफोड झाल्याने कोणत्या नगरसेवकाच्या बाजूने किती जनमत आहे, याची चाचपणीदेखील केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
तरुणांना संधी देणार
भाजपमध्ये काही प्रमाणात परिवर्तन करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये त्याच-त्याच लोकांना संधी देण्यापेक्षा नव्या आणि विशेष करून तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाकडून शोधमोहीमदेखील सुरू करण्यात आली आहे. इतर पक्षांतील महत्त्वाचे पदाधिकारी पक्षात कसे येतील, यावरच पक्षाकडून कोणाला कशी संधी मिळणार आहे, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85271 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..