
दोनशे महिलांच्या हाती कारचे स्टेअरिंग
वसंत जाधव : पनवेल
महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या उद्देशाने पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून स्त्रियांसाठी मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या बॅचमध्ये पस्तीस महिलांच्या हाती स्टेअरिंग देण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील सुमारे दोनशे महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शहरी भागामध्ये घरामध्ये चारचाकी वाहन असले, तरी महिलांना ते चालवता येत नाही. नोकरी करणाऱ्या, व्यावसायिक तसेच गृहिनींना कार चालवण्याची मनोमन इच्छा असते. मात्र त्यांना प्रशिक्षण मिळत नाही. खासगी मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये घेतली जाणारी फी अनेकींना परवडत नाही. तसेच काही महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पनवेल महापालिकेने क्षेत्रातील महिलांना मोफत मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलांकडून अर्ज मागवण्यात आले होते. कामोठे वसाहतीत पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. एकूण ३५ महिलांना गेल्या काही दिवसांपासून मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये लाभार्थी महिलांना २१ दिवस गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिवसाला सात किलोमीटर गाडी चालवता येणार आहे. तसेच हे स्कूल प्रशिक्षणार्थी महिलांना होम पिक अप सर्व्हिस देणार आहे. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत आहे.
दहा लाखांपेक्षा जास्त खर्च
महापालिकेतर्फे मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी नवीन पनवेल येथील विघ्नहर्ता मोटार ड्रायव्हिंग स्कूलची स्पर्धात्मक पद्धतीने निवड करण्यात आली. महापालिकेने दहा लाखांपेक्षा जास्त तरतूद केली आहे.
लर्निंग लायसन्सही देणार
महापालिकेच्या उपक्रमामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना ५२० रुपयांत लर्निंग लायसन्स दिले जाणार आहे. परिवहन विभागाच्या मान्यतेने हा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
दिशा महिला मंचचा पुढाकार
पनवेल महापालिकेच्या मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कामोठे दिशा महिला मंचने पुढाकार घेत महिलांना प्रोत्साहित केले. त्यांनी याबाबत प्रत्यक्ष आणि समाजमाध्यमांवर या उपक्रमाची माहिती देत ६० पेक्षा जास्त महिलांचे या प्रशिक्षणासाठी अर्ज भरून घेत कागदपत्रांची पूर्तता केली. दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका नीलम आंधळे, खुशी सावर्डेकर, विद्या मोहिते यांचे सहकार्य लाभले.
कोट
महापालिका क्षेत्रातील गरजू महिलांना रोजगार मिळावा, त्यांना त्यांच्या पायावर स्वतः उभे राहता यावे, यासाठी महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रम हा उपक्रम हाती घेण्यात आला.
- प्रकाश गायकवाड, प्रमुख, महिला बालकल्याण विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85355 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..