
दिवसभरात १९० प्रकरणांवर सुनावणीचा विक्रम
मुंबई, ता. १० : न्यायालयीन कामकाजाच्या नियमित वेळेपेक्षा सुमारे पाच तास जादा काम करून सुमारे १९० प्रकरणांवर गुरुवारी विक्रमी सुनावणी घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. शिंदे यांचे खंडपीठ कौतुकास पात्र ठरले आहे. न्यायालयीन कामकाजाचा गुरुवारी नियमित वेळ सकाळी साडे दहा ते साडेचार आहे. मात्र न्या. शिंदे आणि न्या. एम. एन. जाधव यांच्या खंडपीठाने साडे दहा ते रात्री आठपर्यंत काम केले. यादरम्यान त्यांनी तब्बल १९० याचिकांवर सुनावणी घेतली.
केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिज्जू यांनी या सुनावणीची दखल घेतली असून शुक्रवारी ट्विट करून न्या. शिंदे यांच्या खंडपीठाचे कौतुक केले. न्या. शिंदे यांनी गुरुवारी रात्री आठपर्यंत काम करून १९० याचिकांवर सुनावणी घेतली, याचा मला आनंद आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. फौजदारी प्रकरणातील याचिका, फर्लो आणि पॅरोलचे दावे यावर न्या. शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम मंडळाने न्या. शिंदे यांची राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. गुरुवारी त्यांच्या न्यायालयात सुमारे २६५ प्रकरणे सुनावणीसाठी होती. मात्र ती पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी जादा वेळ काम करायचे ठरवले. दिवसभरात त्यांनी एक तासभर लंच ब्रेक घेतला होता. न्या. शिंदे यांच्या खंडपीठाव्यतिरिक्त न्या. एस. व्ही. गंगापूरवाला, न्या. पी. डी. नाईक, न्या. भारती डांगरे इ. देखील नियमित वेळेनंतर अधिक वेळ याचिकांवर सुनावणी घेत असतात.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85403 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..