
शेती साहित्य, खतांचे भाव वाढले
खर्डी, ता. १२ (बातमीदार) ः दरवर्षी ओला/सुका दुष्काळ, वणवा व वादळ/वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर शेती साहित्याच्या दरवाढीचे नवे संकट उभे ठाकले आहे. पावसाचे आगमन झाल्याने शहापूर तालुक्यात शेतीच्या कामांना काही ठिकाणी सुरुवात झाली आहे; परंतु खते, शेती अवजारे, बी-बियाणी, कीटकनाशके, औषधे व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच महागाई असताना, शेतीचे साहित्य, खतांचे भाव वाढल्याने शेती कशी करायची, असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी करू लागला आहे.
शहापूर तालुक्यात १०० टक्के शेतकरी खरीप हंगामात भाताची लागवड करतात. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीला मजूर खर्च वाढलेले असतानाच, ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरानेही शंभरी पार केली आहे. शिवाय खत, बी-बियाणांच्या किमती अचानक ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. २०२१-२२ या वर्षासाठी केंद्र सरकारने धान्याचे दर प्रतिक्विंटलला ८० रुपयांने वाढवले. ही दरवाढ मागील वर्षीच्या तुलनेत चार टक्के आहे, मात्र केंद्र सरकारने अनुदान कमी केल्याने बी-बियाणांचे दर वाढले आहेत. सततच्या महागाईने येथील भात उत्पादक शेतकरी त्रस्त झाला असून, तो फळ, फूल लागवडीकडे वळत आहे.
शेणखत उपलब्ध होत नसल्याने अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नाही. महागडी खते घ्यावीच लागतात. वाढत्या महागाईने शेती करायची इच्छा राहिली नसून, वडिलोपार्जित परंपरा पुढे चालत रहावी, यासाठी नाईलाजाने शेती करीत आहे.
- संतोष म्हसकर, शेतकरी, खर्डी
खते, बी-बियाणांचे दर वाढले आहेत. तरीही शेतकऱ्यांनी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, मुरेट ऑफ पोटॅश ह्या खतांचा आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर केल्यास पीक चांगले येईल आणि भरघोस उत्पन्नही मिळेल.
- गोकुळ अहिरे, कृषी सहायक, खर्डी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85448 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..