वसईतील ऐतिहासिक पाऊलखुणा अंतिम घटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईतील ऐतिहासिक पाऊलखुणा अंतिम घटकेत
वसईतील ऐतिहासिक पाऊलखुणा अंतिम घटकेत

वसईतील ऐतिहासिक पाऊलखुणा अंतिम घटकेत

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) ः विरार येथील बावखलपाडा भागात शिलाहार कालखंडातील ऐतिहासिक पाऊलखुणा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शिलाहार कालखंडातील मंदिराच्या अवशेषांमध्ये किचक, मंदिर द्वारपट्टी, श्री गणेशमूर्ती, कीर्तिमुख आदी शिळा वाईट अवस्थेत मातीत गाडल्या गेल्या आहेत. या अवशेषांची अधिकृत नोंदणी करून हे अवशेष किमान मुंबईतील संग्रहालयात सुरक्षित ठेवण्याची मागणी येथील किल्ले वसई मोहिमेचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी केली आहे.
गेली अनेक वर्ष राऊत हे बावखल पाडा, पारोळ भागातील ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत आहेत; परंतु प्रत्येक भेटीत त्यांना हे अवशेष मूळ ठिकाण सोडून अधिकाधिक घरांच्या बांधकामात, रस्त्याखाली, मातीच्या ढिगाऱ्यात आढळतात. तसेच काही जुन्या शिळा जवळपासच्या नव्या घरांच्या बांधकामात पायाशी पुरण्यात आल्याचे दिसून येतात. वसईतील पारोळ येथील अवशेषही पडिक असून, त्यांचे जतन व संवर्धन न केल्यास ते नामशेष होण्याची भीती राऊत यांनी व्यक्त केली. राज्य पुरातत्त्व विभागातील अपूर्ण मनुष्यबळ आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाची वेळखाऊ कार्यप्रणाली यामुळे किमान १०० वर्षांत जिल्ह्यातील सर्वच ऐतिहासिक पाऊलखुणा तेथील अवशेष भुईसपाट झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यातील गडकोटांवरील अवशेष, तोफा, पाणवठे, मंदिरे, शिलालेख आदी अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत मार्गक्रमण करत आहेत. हेच अवशेष कधी नदी पात्रात, तर कधी इतर ठिकाणी विसर्जन करण्यात येतात व काही वर्षांनी भेटले वा शोध लागला म्हणून परत प्रसिद्ध पावतात. ऐतिहासिक अवशेषांचा अशा प्रकारचा खेळखंडोबा सातत्याने सुरू असतो. किमान नामशेष होणाऱ्या या अवशेषांची अधिकृत नोंदणी करून ते सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे. स्थानिक महापालिका आयुक्त व पालघर जिल्हाधिकारी यांनी या विषयावर गंभीर व ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतिहासाच्या पानावर वसईचा उल्लेख
१) दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौलपर्यंत पसरली होती आणि सुमारे ७६५ ते १०२४ पर्यंत जवळपास अडीचशे वर्ष राज्य करीत होती. ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिल्ह्याचा दक्षिण भाग व ठाणे, अलिबाग, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांचा समावेश होता. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लीजुर्न, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील किरवली, वसई, आगाशी, भिवंडी, सोपारा इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतो.
२) उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य ४०० वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा हा कालावधी इ. स. वी. ८०० ते १२६५ असा मानण्यात येतो. यात प्रथम कपर्दी, पुलशक्तीपासून ते तृतीय अनंतदेव, सोमेश्वर असा समावेश आहे. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्टात आणली. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू व अवशेष पालघर जिल्ह्यातील विविध विखुरलेल्या असून, त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85459 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top