
मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१२ : मुंबईत पावसाळ्यापूर्वीच साथीच्या रोगाचा फैलाव पाहायला मिळत आहे. मुंबई पालिका क्षेत्रात गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, पालिका आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, यावर्षी जानेवारीपासून मुंबईत गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे तब्बल २,४४१ रुग्ण नोंदले गेले आहेत. ज्यामध्ये या महिन्याच्या सुरुवातीला ७८ रुग्ण आढळून आले आहेत. २०२० मध्ये शहरात गॅस्ट्रोचे २,५४९ आणि २०२१ मध्ये ३,११० रुग्ण आढळून आले होते. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविडपूर्व दिवसांतील संख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीपेक्षा ही संख्या अधिक आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्येदेखील गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या निर्बंधानंतर लोक आता एकत्र येत आहेत. अनेक ठिकाणी लोक बाहेरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे ही वाढ दिसून येत आहे. बहुतेक लोकांना पहिल्याच दिवशी निर्जलीकरण होते आणि त्यामुळेच त्यांच्यापैकी काहींना रुग्णालयात दाखल व्हावे लागते. यापैकी बहुतेक रुग्ण विषाणूजन्य गॅस्ट्रोएन्टेरिटिस होते आणि दोन ते तीन दिवसांत त्यांची प्रकृती स्थिर होते. अशक्तपणा मात्र काही दिवस राहतो.
आम्ही बर्फाच्या कारखान्यांतील नमुन्यांची चाचणी करणार आहोत आणि शहराच्या कोणत्या भागातून गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे त्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लोक हात धूत नसल्याने आजार बळावतात. हाताची स्वच्छता अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते.
- डॉ मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी
२० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये जास्त समस्या आहे. अतिसाराव्यतिरिक्त, काहींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत आहे. सर्वात संभाव्य कारण दूषित पाणी असू शकते.
- डॉ. आकार झंवर, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट
कोविडच्या निर्बंधानंतर लोक आता एकत्र येत आहेत. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे वाढ झाली आहे.
- डॉ. किशोर साठे, आपत्कालीन औषध तज्ज्ञ
गॅस्ट्रोचा संसर्ग कसा टाळावा -
- अस्वच्छ ठिकाणचे पाणी टाळा.
- जुलाब झाल्यास ओआरएस किंवा साधे मीठ आणि साखरेचे पाणी घ्या.
- वारंवार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- संसर्गाला जास्त अँटीबायोटिक्स घेण्याची गरज भासत नाही.
- घरी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी वापरा व प्रवासात घेऊन जा.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85499 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..