मातीचा कस वाढवण्यासाठी प्रयत्न हवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातीचा कस वाढवण्यासाठी प्रयत्न हवेत
मातीचा कस वाढवण्यासाठी प्रयत्न हवेत

मातीचा कस वाढवण्यासाठी प्रयत्न हवेत

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : भारतातील मातीचा कस व त्यातील सेंद्रिय घटक भयावहरीत्या कमी होत असल्यामुळे ते वाढवण्यासाठी तातडीने प्रोत्साहनपर कृती करायला हवी, असे आवाहन सद्‍गुरू जग्गी वासुदेव यांनी आज व्यक्त केले. केवळ भारतातच नव्हे, तर जगात सर्वत्र मातीमधील सेंद्रिय घटक कमी होत असून त्यामुळे तिचा कसही कमी होत आहे. याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी सद्‍गुरू यांनी नुकतीच २७ देशांची यात्रा केली. मातीचा कस वाढवण्यासाठीच्या धोरणाला ७४ देशांनी समर्थन दिले आहे, असेही ते यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आज त्यांनी हजारो नागरिकांना या विषयावर माहिती देऊन मातीचा कस वाढवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. आज जगात कोठेही मातीमधील सेंद्रिय घटक तीन टक्‍क्‍यांच्या वर नाहीत. मातीतील सर्वात जास्त सेंद्रिय घटक हे उत्तर युरोपात दीड टक्क्याच्या आसपास आहेत. भारतातही हे घटक ०.६८ टक्के एवढेच आहेत. सेंद्रिय घटक एक टक्क्याच्या खाली गेले की तेथे वाळवंट होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे भारतात याबाबत तातडीने धोरण तयार करायला हवे, असेही ते म्हणाले.

हे धोरण प्रोत्साहनात्मक उपायांवर आधारित हवे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या मातीतील सेंद्रिय घटक तीन टक्क्यांच्या वर जाईल, त्याला प्रोत्साहन मिळेल, अशी व्यवस्था हवी. शेतीचा आकार जास्त असला, की प्रोत्साहनही जास्त द्यावे, अशा प्रकारे योजना करावी; तरच शेतकरी मातीचा कस वाढवण्याकडे लक्ष देतील, असेही ते या वेळी म्हणाले.

काम वेगात व्हावे!
सध्या माती निकृष्ट झाल्यामुळे पिके चांगली निघावी म्हणून शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. जर मातीतले सेंद्रिय घटक वाढवून मातीचा कस वाढवला, तर रासायनिक खतांचा वापरही कमी होईल. आताच रासायनिक खतांचा वापर थांबवला, तर अन्नधान्याचे उत्पादन २५ टक्के कमी होऊन भयावह परिस्थिती निर्माण होईल. देशातील अनेक राज्ये अशा प्रकारचे प्रोत्साहनात्मक धोरण तयार करायला तयार आहेत; मात्र हे काम वेगात व्हावे, अशी अपेक्षाही सद्‍गुरूंनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85523 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top