ठाण्यात शुल्कवाढीचा पालकांना ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात शुल्कवाढीचा पालकांना ताप
ठाण्यात शुल्कवाढीचा पालकांना ताप

ठाण्यात शुल्कवाढीचा पालकांना ताप

sakal_logo
By

ठाणे, ता. १३ (बातमीदार) : ठाणे शहरातील सर्व माध्यमांच्या बहुतांश शाळांची घंटा आजपासून वाजली. कोरोना साथीच्या मोठ्या कालावधीनंतर शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष नियमित सुरू झाले असले, तरी पालकांसमोरील अनेक प्रश्न संपायचे नाव घेत नाहीत. महागलेले शैक्षणिक साहित्य, शाळांचे वाढलेले शुल्क हे सर्व अडथळे निभावून नेत असतानाच आता पालकांना स्कूल बसच्या शुल्कवाढीचाही सामना करावा लागत आहे. इंधनाची दरवाढ तसेच कोरोना काळात स्कूल बसचालकांना व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदा बसच्या शुल्कांमध्ये पूर्वीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांची वाढ झालेली आहे.
शहरी भागात आई-वडील असे दोन्ही पालक आपल्या नोकरी अथवा व्यवसायात व्यग्र असतात. अशात दररोज मुलांना स्वतः शाळेतून ने-आण करणे प्रत्येक वेळा शक्य होत नाही. तेव्हा अनेक जण मुलांना स्कूल बसमधून शाळेत पाठवण्यास प्राधान्य देत असल्याने स्कूल बसला प्रचंड मागणी असते; मात्र मागील अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर शंभरी पार गेल्याने तसेच स्कूल बसची संख्याही कमी झाल्याने स्कूल बसच्या शुल्कामध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. यावर्षी स्कूल बसचे शुल्क साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच अनेक बसचालक पालकांना वर्षाचे अथवा सहा महिन्यांचे शुल्क एकत्र भरण्याचा आग्रह करीत असल्याने मुलांचे शैक्षणिक शुल्क भरावे, की स्कूल बसचे शुल्क भरावे, अशा कुचंबणेत पालक सापडले आहेत.
सध्या स्कूल बसची संख्या कमी झाल्याने मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी आरटीओच्या नियमांना डावलून अनधिकृत रिक्षा, व्हॅन या वाहनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांना पेव फुटल्याचा आरोप स्कूल बसचालक संघटनांनी केला आहे.

यंदा स्कूल बसची संख्या कमी झाल्यामुळे तसेच चांगली स्कूल बस शोधण्यात पालकांचा बराचसा वेळ खर्च होत आहे. इंधन दर वाढल्याने स्कूल बसचे दरही वाढले आहेत. या वाढीव दरांचा पालकांवर अधिकचा भार पडला आहे.
- शीतल चव्हाण, पालक संघटना

शैक्षणिक साहित्य, शाळांचे वाढलेले शुल्क आदींमध्ये वाढ झालेलीच होती; मात्र आता स्कूल बसच्या शुल्कातही वाढ झाली आहे. पूर्वी मुलाच्या वर्षभराच्या स्कूल बस शुल्कासाठी ३२ हजार मोजावे लागत होते; मात्र त्यात यंदा पाच हजारांची वाढ झाली आहे.
- सुप्रिया निकम, पालक

शुल्कवाढीशिवाय पर्यायच नाही
कोरोना काळात स्कूल बसमालकांना बरेच नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेकांनी या व्यवसायातून माघारही घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनानंतर घराजवळील शाळांमध्ये प्रवेश घेतले, तसेच पालकवर्गही काही प्रमाणात मुलांना बसमधून पाठवण्यास इच्छुक नसल्याचे जाणवले. यामुळे ठाणे शहारातील स्कूल बसच्या संख्येत २० टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच इंधनाचे दर गेल्या दोन वर्षांत बरेच वाढले आहेत. परिणामी आम्हाला शुल्क वाढविण्यावाचून पर्याय राहिला नाही, असे ठाण्यातील स्कूल बसचालक संघटनेच्या मनोज पावशे यांनी सांगितले.

मिरा-भाईंदरमध्येही शुल्कवाढीचा झटका
भाईंदर (बातमीदार) : मुंबई, ठाण्यापाठोपाठ मिरा-भाईंदरमध्ये स्कूलबसचे शुल्क सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती आधीच बिकट झालेली असताना बस शुल्कात झालेल्या वाढीमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोरोना काळात जवळपास दोन वर्षे शाळा बंद होत्या. या काळात शाळेच्या बसही बंदच होत्या; परंतु आता शाळा सुरू होत असताना पालकांना बसचे वाढीव शुल्क भरावे लागत आहे. काही शाळांनीदेखील या वर्षी शालेय शुल्कात वाढ केली असल्यामुळे पालकांना दुहेरी फटका बसत आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, व्यवसाय देखील मंदीत आहे, दिवसेंदिवस महागाईदेखील वाढत आहे, अशा परिस्थितीत बस शुल्कातील वाढ परवडणारी नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या आधी असलेल्या शुल्कात या वर्षी तब्बल २० टक्के वाढ झाली आहे; मात्र खासगी वाहनचालक यापेक्षा कितीतरी कमी शुल्कात विद्यार्थ्यांची ने-आण करत आहेत, अशी माहिती एका पालकाने दिली. शाळांच्या बस शुल्कात अवास्तव वाढ झाल्यामुळे पालक शाळेच्या बसऐवजी खासगी वाहनांकडे वळत असल्याचेही या पालकाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85573 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top