मिरा रोडच्या न्यायालयाला पुढील वर्षीचा मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा रोडच्या न्यायालयाला पुढील वर्षीचा मुहूर्त
मिरा रोडच्या न्यायालयाला पुढील वर्षीचा मुहूर्त

मिरा रोडच्या न्यायालयाला पुढील वर्षीचा मुहूर्त

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : गेली अनेक वर्षे रखडलेले मिरा रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज न्यायालयाच्या कामाची पाहाणी केली. न्यायालयाच्या इमारतीचे व त्याच्याशी संबंधित इतर सर्व कामे दिवाळीपर्यंत पूर्ण होतील, त्यानंतर न्यायाधीश आणि इतर कर्मचारी नियुक्तीनंतर नव्या वर्षात न्यायालय सुरू होईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
निधीअभावी रखडलेल्या न्यायालयाच्या इमारतीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील अंतर्गत फर्निचर, अन्य सोयी-सुविधांचे काम निधीअभावी बरीच वर्षे रखडले होते. आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या चार महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत, त्यानंतर मिरा-भाईंदर पालिकेने इमारतीला भोगवटा दाखला द्यावा, अशा सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ही कामे पूर्ण झाली की न्यायाधीश व अन्य कर्मचारी वर्ग नियुक्तीची कामे त्यापुढील चार महिन्यांत पूर्ण करून जानेवारीमध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शिवाय भविष्यातील गरज ओळखून न्यायालयाच्या इमारतीचे आणखी दोन मजले वाढीव बांधकाम करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठीच्या निवासस्थानाचे बांधकाम करण्याचे कामही पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. न्यायाधीशांच्या राहण्याच्या दोन मजली इमारतीसाठी अडीच कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यावेळी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. पाटील, उपअभियंता संपत मंडलिक व इतर अधिकारी, तसेच मिरा-भाईंदर वकील संघटनेचे पदाधिकारी तसेच वकील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85592 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top