
बदलापुरात २५ जागांवर महिलाराज
बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. यंदा द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एकूण १९ प्रभागांत प्रत्येकी एक विभाग हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या आकडेमोडीत द्विसदस्य पद्धतीनुसार (प्रभाग ७ हा तीन सदस्यांचा अपवाद वगळून) एकूण ४९ प्रभागांपैकी २५ प्रभागांमध्ये (प्रत्येकी एक व एका त्रिसदस्यीय प्रभागात २) एकूण २५ नगरसेविका निवडून येणार आहेत.
कात्रप येथील श्री जी आर्केडमधील पालिकेच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांच्या हातातून चिठ्ठी काढत हे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणात अनुसूचित जातींसाठी चार, अनुसूचित जमातींसाठी १ अशा एकूण पाच जागा या चिठ्ठ्या काढून महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. ही आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी अभिजीत धांडेपाटील यांच्या व मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यंदा द्विसदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. एकूण जागांपैकी अनुसूचित जातींसाठी सात, अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव आहेत; तर महिलांच्या अनुसूचित जातींसाठी चार; तर अनुसूचित जमातींसाठी एका जागेचे आरक्षण पडले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार असल्याने हा कोटा सर्वसाधारण गटांमध्ये वळवण्यात आला आहे.
आरक्षण सोडतीवर कोणाला हरकती व सूचना घ्यायच्या असतील त्यांनी १५ ते २० जून या कालावधीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या नोंदवाव्यात, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अभिजीत धांडेपाटील यांनी दिली. या हरकती व सूचनांवर अंतिम यादी ही १ जुलैपर्यंत प्रसिद्ध होईल, अशी माहिती मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली.
असे पडले आरक्षण
निवडणूक आयोगाने अनुसूचित जातींसाठी प्रभाग क्र. ६, ९, १०, १२, १७, २२, २३ यातील प्रत्येकी ‘अ’ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या होत्या. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक ६, ९, १२ व २२ प्रभागातील जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्र. १ व २ या प्रमाणे प्रभाग क्र. १ ‘ब’ हा अनुसूचित जमाती सर्वसाधारण; तर प्रभाग क्र. २ ‘अ’ हा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85598 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..