
चित्रीकरणाचा कचरा उघड्यावर!
वसई, ता. १३ (बातमीदार) ः मुंबईला लागूनच असलेल्या निसर्गसंपदेने नटलेल्या वसईत चित्रपट, शॉर्ट फिल्म चित्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या परिसरात सातत्याने चित्रीकरण सुरू असल्याचे दिसून येते; मात्र चित्रीकरणानंतर संबंधितांकडून येथे उघड्यावरच कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. उघड्यावर कचरा टाकल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असून याकडे मात्र महापालिका कानाडोळा करत आहे. त्यामुळे पावसाळ्यात निचरा होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गास-चुळणे मार्ग, सनसिटी, नालासोपारा, विरार भागात मुंबई, ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरातून सिरीयल, सिनेमा, शॉर्ट फिल्म चित्रीकरणासाठी मोठ्या संख्येने कलाकारांचा कल असतो. चित्रीकरण करणाऱ्या युनिटकडून खाद्यपदार्थ, चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य आणले जाते. ज्यात वापरलेले फायबर, थर्माकोल खाद्यपदार्थांचे वेष्टण यासह अन्य टाकाऊ कचरा चित्रीकरण पूर्ण झाल्यावर मोकळ्या जागेत भिरकावून निघून जातात. त्याची विल्हेवाट लावली जात नाही.
एकीकडे विविध चित्रपट, मालिंकांचे चित्रीकरण वसईत होत असल्याने नागरिकांना अभिमान वाटत असला तरी मात्र कचरा, अस्वच्छता, प्रदूषण यामुळे चिंतादेखील वाटत आहे. त्यामुळे महापालिकेने परवानगी देताना स्वच्छतेचे धडे देणे गरजेचे आहे.
शहर सुंदर, स्वच्छ राहावे याकरिता महापालिका विविध योजना कागदावर आणत आहे; मात्र प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवल्या जातात हे चित्रीकरणानंतर होणारी अस्वच्छता पाहता लक्षात येते. त्यामुळे प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्ती केली पाहिजे, असे मत सुजाण नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.
नाले तुंबण्याची भीती
चित्रीकरणानंतर कचरा फेकून दिला जातो. वसईच्या खाडीजवळ असणाऱ्या गास चुळणे मार्गावर अशाच प्रकारे कचरा टाकण्यात आला आहे. या ठिकाणी मोठे नाले आहेत. या कचऱ्यामुळे नाल्याच्या प्रवाहात अडथळा येऊन नाले तुंबू शकतात. अशा चित्रीकरणांवर महापालिका प्रशासनाने नजर ठेवली तरच अंकुश बसणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85599 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..