पनवेल महापालिकेचे ११ नगरसेवक वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल महापालिकेचे ११ नगरसेवक वाढले
पनवेल महापालिकेचे ११ नगरसेवक वाढले

पनवेल महापालिकेचे ११ नगरसेवक वाढले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १३ ः पनवेल महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी सोमवारी (ता.१३) निवडणूक विभागातर्फे प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या. या रचनेत महापालिकेची प्रभाग संख्येत १० ने वाढ होऊन ३० एवढी झाली आहे. परंतु वाढीव लोकसंख्येच्या आधारावर नव्याने प्रभाग रचना तयार करताना जुन्या प्रभागांचे विभाजन झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांचा ताळमेळ जोडताना महाविकास आघाडी बहुल मतदारांचे विभाजन झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
१ ऑक्टोबर २०१६ ला स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची मे २०१७ ला पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. बहुसदस्यीय पद्धतीने प्रभागांची रचना केल्यामुळे पनवेल महापालिकेत २० प्रभाग आणि ७८ नगरसेवकांची संख्या मिळाली. आता महापालिकेचे पाच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा नव्याने निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. परंतु या निवडणुकीत नव्याने प्रभाग रचना केली जात असल्याने महापालिकेच्या वाट्याला जास्त नगरसेवक आले आहेत. पूर्वीचे आकाराने आणि लोकसंख्येने मोठे असणाऱ्या प्रभागांचे विभाजन करून एकाचे तीन आणि चार प्रभाग करण्यात आले आहेत.
निवडणूक विभागाच्या नव्या प्रभाग रचनांचा विरोधी पक्षांतील नगरसेवकांसहीत काही ठिकाणी सत्ताधारी नगरसेवकांनाही फटका बसला आहे. पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रभागातील काही भाग दुसऱ्या प्रभागांना जोडल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीला महत्त्वाचे नगरसेवक दिलेल्या कळंबोलीचे पाच विभागांत विभाजन झाले असून त्‍यातील काही भाग नावडे आणि टेंभोडे गावाला जोडले गेले आहेत.
शेकापच्या तीन नगरसेवकांचे जुने पारंपरिक प्रभाग तोडून घोट, कोयनावेळ आणि पेंधर अशा गावांना जोडले गेले आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील आणि विजय खानवकर यांच्या प्रभागात फारसे बदल नाहीत. कामोठ्यातील शेकाप नगरसेवकांचे प्रभागात आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे. नगरसेविका कविता गायकवाड यांचा कळंबोलीतील प्रभागात खिडूकपाडा जोडला गेला आहे.


हरकती व सूचनांसाठी २४ जून पर्यंत मुदत
पनवेल महापालिकेच्या संकेतस्थळावर आज निवडणूक विभागाकडून प्रभाग रचनांचा प्रारूप मसुदा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागांचे हद्दी, नकाशे प्रसिद्ध केले आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केल्यानंतर २४ जून पर्यंत या प्रारूप मसुद्यावर नगरसेवक आणि संबंधित घटकांना हरकती व सूचना घेता येणार आहेत. सादर केलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी नंतर निर्णय होईल.

जुने नगरसेवक
नगरसेवक - आधी - ७८ आता - ८९
जुने प्रभाग
प्रभाग - आधी - २० आता - ३०


२०११ ची लोकसंख्या ५,०९,९०१
एससी - ३७,९२३ एसटी १७,७२७


मविआच्या भूमिकेकडे लक्ष
पनवेल महापालिकेतील ७८ नगरसेवकांपैकी भाजपची पक्षिय बलाबल सर्वाधिक आहे. भाजपकडे ५३ नगरसेवक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ शेकापचे २३ नगरसेवक आहेत. शेकापचे ६ नगरसेवकांनी अनौपचारिकरीत्‍या काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. तर भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी बंडखोरी केल्यामुळे काढून टाकले आहे. त्याचा परिणाम प्रारूप प्रभाग रचनांवर दिसून येतो. भाजपचे आणि त्यांच्या जवळच्या नगरसेवकांचे प्रभाग बऱ्यापैकी आहेत तसेच आहेत. याउलट शेकापच्या नगरसेवकांच्या प्रभागात आमूलाग्र बदल झालेले दिसतात. त्यामुळे विरोधी पक्षांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85605 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top