किशोरवयीनसाठी आता `हर घर दस्तक` | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किशोरवयीनसाठी आता `हर घर दस्तक`
किशोरवयीनसाठी आता `हर घर दस्तक`

किशोरवयीनसाठी आता `हर घर दस्तक`

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १४ : ठाणे जिल्ह्यात दररोज ५०० हून अधिक कोरोनाबाधितांची भर पडत असतानाच दुसरीकडे शाळाही सुरू होत आहेत. त्यामुळे १२ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणावर भर देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात १ जुलैपासून ‘हर घर दस्तक’ ही मोहीम पुन्हा राबवण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर शाळांमध्येही लसीकरण सत्र घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असून, लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी सुटीच्या दिवशी रेल्वे स्थानकांबाहेर केंद्र उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या वाढतच आहे. यामध्ये जोखमीचे रुग्ण कमी असले, तरी वाढती रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात कोरोना लसीकरणासाठीच्या जिल्हा कृती दलाची बैठक झाली. त्या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी, तालुका आणि पालिका, नगरपालिका आरोग्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘मिशन हर घर दस्तक- २’ मोहिमेत १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तेथे लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले. फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील नागरिकांना पूरक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता असून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शाळांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करून १०० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना डॉ. गंगाधर परगे यांनी दिल्या. लसीकरणादरम्यान एखादी व्यक्ती, संस्था अडथळा आणत असल्यास किंवा लसीकरणाविषयी गैरसमज पसरवित असल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

७५ टक्के ठाणेकरच लसवंत
ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी सध्या शासकीय आणि खासगी अशी एकूण १,०२१ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार १३ जूनअखेर संपूर्ण जिल्ह्यात पहिला डोस ७० लाख ३० हजार ९५० (८५ टक्के); तर दुसरा डोस ६२ लाख ४६ हजार (७५ टक्के) नागरिकांनी घेतला आहे. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांमध्ये पहिला डोस १ लाख ४१ हजार (४४ टक्के); तर दुसरा डोस ७५ हजार २७० (५३ टक्के) असे लसीकरण झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85709 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top