
पाच मजली इमारतीवर कारवाई
वाशी, ता. १४ (बातमीदार) : ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या सेक्टर एकमधील शिवकॉलनी परिसरात पाचमजली बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू होते. या अनधिकृत इमारतीवर पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून आज (ता. १४) धडक कारवाई करण्यात आली. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आल्याने अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार अतिक्रमणविरोधी विभागाचे उपायुक्त अमरिश पटनीगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्या सहकार्याने अतिक्रमण अभियंता रोहित ठाकरे व मयुरेश पवार यांनी कारवाई केली. ऐरोली शिवकॉलनी परिसरात महात्मा गांधी स्कूलच्या शेजारी उमेश चव्हाण या बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकाम करण्यात येते. नवी मुंबई महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती; परंतु त्याने अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. त्यामुळे पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली होती.
वर्षभरापूर्वी पालिकेने या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता; तरी बांधकाम व्यावसायिकाकडून पुन्हा बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. अखेर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पुन्हा एकदा मोहीम राबवत इमारतीवर कारवाई केली. या धडक मोहिमेसाठी १२ मजूर, एक पोकलेन, तीन गॅस कटर, पोलिस बंदोबस्त असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
शिवकॉलनी परिसरात अनधिकृत बांधकाम करत असल्यामुळे पाच मजली इमारतीवर कारवाई करण्यात आली. वर्षभरापूर्वी या बांधकाम व्यावसायिकावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महेंद्र सप्रे, सहायक आयुक्त
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85739 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..