मलेशियाच्या हॅकर ग्रुपकडून भारतावर सायबर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलेशियाच्या हॅकर ग्रुपकडून भारतावर सायबर हल्ला
मलेशियाच्या हॅकर ग्रुपकडून भारतावर सायबर हल्ला

मलेशियाच्या हॅकर ग्रुपकडून भारतावर सायबर हल्ला

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या विवादास्पद टिप्पणीचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. कतार आणि कुवेतसारख्या आखाती देशानंतर आता दक्षिण-पूर्व आशियातील मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. त्याअंतर्गत देशभरातातील अनेक संस्थांवर अज्ञात हॅकरनी मोठा सायबर हल्ला केला आहे. देशभरातील विविध सरकारी विभागांच्या आणि खासगी अशा ७० हून अधिक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील ५० वेबसाईटचा समावेश आहे. ठाणे पोलिसांची वेबसाईटही हॅक करण्यात आली असून ‘जगभरातील मुस्लिमांची माफी मागा’ असा इशारा देण्यात आला आहे.

मलेशियातील ड्रॅगन फोर्स हॅकर ग्रुपने नूपुर शर्मा यांनी केलेले वक्तव्य, ज्ञानवापी मशीद आणि मुस्लिमविरोधी इतर काही विषयांमुळे भारतावर सायबर हल्ला करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर देशभरातातील अनेक संस्थांवर अज्ञात हॅकरनी मोठा सायबर हल्ला केला आहे. त्यामध्ये विविध सरकारी विभागांबरोबरच खासगी अशा ७० हून अधिक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील ५० वेबसाईटचा समावेश आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हॅकर्सच्या ग्रुपने ‘opspatuk’ ऑपरेशन सुरू केले असून, त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक किंवा प्रतिहल्ला असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. गृह विभागानेही सायबर सेलला हल्ल्याच्या तपासाचे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मीयांची माफी मागा, हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. त्यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरीला जाण्याचीही शक्यता असून त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

गृहमंत्र्यांनी दिली पुष्टी
नूपुर शर्मा प्रकरणात सध्या देशातल्या अनेक खासगी आणि सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवरही हल्ला करण्यात आला. दोन्ही आंतरराष्ट्रीय सायबर हल्ल्यांची पुष्टी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. वळसे-पाटील त्याबाबत माहिती देताना म्हणाले, की दोन दिवसांत देशात अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या. सायबर सेलप्रमुख त्याबाबत तपासणी करत आहेत.

ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅकर्सच्या निशाण्यावर
भारतावर झालेल्या सायबर हल्ल्यात ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक झाली होती. साधारण आठ तासांनी ती परत कार्यान्वित झाली. सायबर हल्ल्यामागे मलेशिया आणि इंडोनेशियाच्या हॅकरचा हात असल्याचा संशय आहे. ‘जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा; अन्यथा आम्ही शांत बसणार नाही’ अशा आशयाचा मजकूर हॅकर्सने ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर टाकला आहे. वेबसाईट सुरू करताच स्क्रीनवर ‘हॅक्ड बाय वन हॅट सायबर टीम’ असा मेसेज दिसत होता. पहाटे ४ वाजता हॅक झालेली ठाणे पोलिस आयुक्तालयाची वेबसाईट तब्बल आठ तास बंद होती.
ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने सर्व प्रकरणाचा प्राथमिक तपास केला असता मंगळवारी पहाटे ४ वाजता वेबसाईट हॅक झाली असल्याचे समोर आले. वेबसाईट सकाळी ९.३० च्या सुमारास पूर्ववत करण्यात आली. वेबसाईटमधील सर्व माहिती सुरक्षित असून इतर डाटाही मिळवण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत असल्याची माहिती सायबर सेलचे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.

काय आहे संदेश?
भारत सरकार, तुम्ही पुन्हापुन्हा इस्लामिक धर्माविषयी द्वेष पसरवत आहात. धर्माला अडचणीत आणत आहात. आमच्या धर्माचा, धर्मगुरूचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही त्वरित जगभरातील मुस्लिमांची माफी मागा! आता आम्ही शांत बसणार नाही, असे हॅकर्सनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85750 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top