
ऑनलाईन कर्जवसुलीचे रॅकेट उध्द्वस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः ऑनलाईन कर्ज देऊन त्यानंतर कर्जवसुलीच्या नावाने फसवणूक केल्याचे प्रकार मुंबईत वाढीस लागले आहेत. अशाच प्रकारचा गुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात आठ हजार रुपयांच्या बदल्यात ९३ हजार वसूल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
हॅप्पी नामक एका ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲपकडून एका व्यक्तीस आठ हजार रुपयांचे ऑनलाईन कर्ज देण्यात आले होते. या कर्जाच्या बदल्यात तक्रारदारकडून ९३ हजार रुपयांची कर्जवसुली ॲपच्या माध्यमातून केली गेली. आरोपी एका इंटरनेट ॲप्लिकेशनद्वारे कर्जदारांकडून वसुली करत असत. ज्याने कर्ज घेतले नाही अशा व्यक्तींनाही फोन करून त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. सुहेल सय्यद, अहमद रझा हुसैन, सय्यद मोहम्मद, मोहम्मद कैफ कादरी आणि मुफ्तियाज पिरजादे अशी आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी महाराष्ट्र आणि कर्नाटकचे रहिवासी आहेत.
हॅप्पी अॅप नावाच्या अॅप्लिकेशनवरून कर्ज देऊन कर्जदारांकडून कर्जाव्यतिरिक्त आणखी पैशांची मागणी केल्याची तक्रार सायबर पोलिसांना मिळाली होती. तपासात असे आढळून आले, की ॲपसाठी कर्जाची वसुली करणाऱ्या आरोपींना महिन्याला वेतन म्हणून १२ ते १३ हजार रुपये मिळत होते. याशिवाय प्रोत्साहनपर रक्कमही मिळत असून प्रतिदिन ४० हजार रुपयांचे कर्जवसुलीचे टार्गेट ठेवण्यात आले होते. आरोपींपैकी एकाने बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांना याच प्रकारचे २०७४ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85756 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..