
बारावीचा निकाल यंदा कमी लागल्याने चार शिक्षकाचे निलंबन
वाडा : बारावीचा निकाल यंदा कमी लागल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित अध्यापन केले नसल्याचा ठपका ठेवून चार शिक्षकांना निलंबित केल्याचा प्रकार वाडा शहरातील आ. ल. चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयात घडला आहे. पालकांनी शिक्षकांची संस्था अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मुख्याध्यापकांनी हे निलंबन केले. या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली असून, शिक्षकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दि वाडा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद लक्ष्मण चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १२ वीचा निकाल यावर्षी कमी लागला. त्यातही भौतिकशास्त्र व गणित या विषयांचा निकाल अतिशय कमी लागला आहे. यामध्ये लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय कमी गुण मिळाले असून त्यामुळे बहुतांश विद्यार्थी नापास झाले. याबद्दल पालकांनी संस्थेकडे तक्रारी केल्या आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सागर नागरगोजे, योगेश दढेकर, राजेश चव्हाण व श्रीकांत जोशी हे सर्व शिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींना अपमानास्पद वागणूक देतात. तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये नापास करू, असे अपशब्द त्यांनी वापरले होते. तसेच आमच्याकडे शिकवणीला न आल्यास तुम्हाला नापास करू, असे सांगून मुलांचे खच्चीकरण केल्याच्या तक्रारी पालकांनी संस्थेकडे केल्या होत्या.
हेही वाचा: कृषि विद्यापीठाचे ४ टन कांदा बियाणे विक्री; ६.७ टन कांदा बियाणे अद्याप शिल्लक
संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण सोनटक्के यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याध्यापकांना पत्र पाठवून निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांनी चार शिक्षकांना निलंबित केले आहे. दरम्यान, शिक्षकांना कुठल्याही प्रकारची कारणे दाखवा नोटीस न देता निलंबित केल्याने ही निलंबनाची प्रक्रिया अत्यंत चुकीची असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे.
पालक व अध्यक्ष यांच्या दबावामुळे मला शिक्षकांच्या निलंबनाचे पत्र काढावे लागले आहे. हे अधिकार मला नसून संस्थेला आहेत. निलंबनाची प्रक्रिया चुकीची आहे.
- आर. एस. पाटील, मुख्याध्यापक तथा प्राचार्य आ. ल. चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालय, वाडा
महाविद्यालयाच्या त्या चार शिक्षकांना निकाल कमी लागला म्हणून तात्पुरते निलंबित केले आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्यांना कामावर पुन्हा हजर केले जाईल.
- श्रीकृष्ण सोनटक्के, अध्यक्ष, दि वाडा को-ऑप एज्युकेशन सोसायटी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85815 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..