
शाळांमध्ये पुन्हा तेच चैतन्य...
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : कोरोना काळातील तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर चैतन्य आणि उत्साहवर्धक वातावरणात बुधवारी, १५ जूनला ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाचे निर्बंध, उन्हाळी सुट्या आदींमुळे शांत असणाऱ्या शाळेच्या इमारती प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी पुन्हा किलबिलाटाने जिवंत झाल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता शाळा प्रशासनांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रवेशद्वारावर ढोल-ताशांच्या गजरात, औक्षण करून, भेटवस्तू देत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आले.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी पाच तालुक्यांतील जिल्हा परिषेदच्या एक हजार ३२८ शाळा तसेच जिल्ह्यातील पाच तालुके आणि महापालिका क्षेत्रात विविध आस्थापनांच्या एक हजार ६२० माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्यात आले. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांमध्ये स्वच्छताविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रवेशोत्सव पार पडला. जिल्हा परिषदेच्या काही शाळांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रभात फेरी, तसेच बैलगाडी आणि स्थानिक वाहनांमधून वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या.
ठाणे शहरातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने खबरदारी घेत बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली होती. मोठ्या कालावधीनंतर शाळा दोन्ही सत्रांत पूर्णवेळ भरवण्यात आल्या असून, मित्र-मैत्रिणींना भेटता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
स्वागत अन् उद्घाटनही
- भिवंडीतील जिल्हा परिषद केंद्र शाळा काल्हेर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
- ठाणे शहरातील आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विद्यालयात डोरेमॉन आणि छोटा भीम या कार्टून कॅरेक्टर्सने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या वेळी विद्यार्थ्यांना चॉकलेटही देण्यात आले.
- ठाणे शहरातील माऊली मंडळ शाळेत पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून सुशोभित केलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.
प्रवेशोत्सव ठरला खास
शाळेचा प्रवेशोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी खास ठरावा याकरिता ठाण्यातील शिव समर्थ शाळेत शिक्षकांकडून शाळेची इमारत फुलांच्या माळांनी सजवून सुशोभित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता प्रवेशद्वारावर रांगोळी काढून, ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष संतोष कारखानीस आणि सदस्य राजश्री जोशी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन आणि चॉकलेट वाटण्यात आले. मुख्याध्यापक चंद्रकांत घोडके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी विद्यार्थी मिलिंद दाभोळकर यांची विशेष उपस्थिती होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85817 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..